जळगाव : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते जळगावात रविवारी (दि. 10) होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला शासनाने स्थगिती दिली. त्यामुळं मोठा पेच निर्माण झाला आहे. पुतळ्यांच्या अनावरणाच्या मुद्द्यावरून सध्या जळगावात चांगलंच राजकारण तापलं असून ठाकरे गटाविरुद्ध भाजप आणि शिंदे गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.
जळगाव शहरातील पिंप्राळा येथे महापालिकेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. तर महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या प्रयत्नातून पिंप्राळा येथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. महापालिकेत महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील हे दोन्ही ठाकरे गटाचे आहेत.
उद्धव ठाकरेंच्या हस्ते पिंप्राळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पुतळ्याच्या अनावरणासाठी येणार असल्याचे आश्वासन दिले होते. आता पुतळ्याचे काम पूर्ण झालं. मात्र, आता या अनावरण सोहळ्याला शासनाने स्थगिती दिली.
या दोन्ही पुतळ्यांच अनावरण हे राजशिष्टाचारानुसार व्हायला हवं, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची तारीख वेळ निश्चित होईपर्यंत कार्यक्रम करू नये असे आदेश शासनाने काढले आहेत. शासनाने हे आदेश काढल्यानंतर वाद वाढला. शासनाने घेतलेल्या भूमिकेला ठाकरे गटाने आक्षेप घेतलाय. त्यामुळं जळगावात ठाकरे गट विरुद्ध भाजप-शिंदे गट असा सामना रंगला आहे.
Subhedar: सुभेदार सिनेमा पाहिल्यावर समीर वानखेडे यांनी शेअर केली खास पोस्ट; म्हणाला, ‘खरे हिरो…’
हे दोन्ही पुतळे महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आले आहेत. त्याला राज्य शासनाचा निधी देण्यात आलेला आहे. सध्य महापालिकेत ठाकरे गटाची सत्ता आहे, परंतु राज्यात भाजपा आणि शिंदे गट सत्तेत आहेत. त्यामुळे दोन्ही पुतळ्यांच्या अनावरणाच्या मुद्द्यावरून श्रेय वादाची लढाई रंगली आहे.
ठाकरे गटाकडून या दोन्ही पुतळ्यांचा अनावरण करण्यासाठी उद्धव ठाकरेंना आमंत्रित करण्यात आले असून ते उद्या जळगावात येणार आहेत. मात्र या कार्यक्रमाच्या पूर्वीच हा वाद वाढला आहे. दरम्यान काहीही झालं तरी उद्याच दोन्ही पुतळ्यांच अनावर उद्धव ठाकरेंच्या हस्ते करू असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे. तर या विषयात कोणत्याही स्वरूपाचा राजकारण नाही. परंतु शासनाच्या आदेशानुसार दोन्ही पुतळ्यांचं अनावरण हे राजशिष्टाचारानुसारच व्हायला हवं, असं भाजप आणि शिंदे गटाचे म्हणणं आहे.
दरम्यान, या दोन्ही पुतळ्यांचे अनावरण कोणाच्या हस्ते होते, हेच पाहणं महत्वाचं आहे.