Download App

MIDC : ऐन दुपारी तीन वाजता राम शिंदे विरुद्ध रोहित पवार यांच्या संघर्षाचा भडका!

नागपूर : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कर्जत-जामखेड एमआयडीसीसाठी बैठक बोलावली आहे. दुपारी तीन वाजता उद्योगमंत्र्यांच्या दालनात ही बैठक होणार आहे. या बैठीकासाठी भाजपचे विधान परिषदेचे माजी आमदार राम शिंदे आणि विभागाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र बैठकीला आपल्याला आमंत्रित न करण्यात आल्याचा दावा करत कर्जत-जामखेडेचे विधानसभेचे राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी या बैठकीवर तीव्र आक्षेप घेतला आहे.

आमदार राम शिंदे यांच्या सांगण्यावरुन या बैठकीला आमंत्रित करण्यात आले नसल्याचा दावा करत रोहित पवार यांनी सामंत यांच्यावर राजकीय दबावापोटी आपण दुजाभाव करत असल्याचा आरोप केला आहे. आपली ही कृती म्हणजे ‘कुणाशीही आकस बाळगणार नाही किंवा ममत्वभाव ठेवणार नाही,’ या आपण घेतलेल्या शपथेचा सरळसरळ भंग आहे असेही पवार यांनी म्हटंले आहे. (Industries Minister Uday Samant has called a meeting for Karjat-Jamkhed MIDC)

पुणे लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर होणार? हायकोर्टाने आयोगाला कडक शब्दांत फटकारले

रोहित पवार संघर्ष यात्रेत असतानाच राम शिंदेंनी डाव साधला :

दरम्यान, रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रेचा आज अखेरचा दिवस आहे. दुपारी एक वाजता नागपूरमध्ये विराट सांगता सभा होणार आहे.त्याचवेळी राम शिंदे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन ही बैठक घेण्याचा आग्रह धरला होता. त्यानुसार आज दुपारी तीन वाजता ही बैठक बोलवण्यात आली आहे. विशेष म्हणजे रोहित पवार यांनी सामंत यांना आठ डिसेंबर रोजी लिहिलेल्या पत्रात 12 डिसेंबरनंतर ही बैठक घ्यावी अशी मागणी केली होती. पण त्यानंतरही सामंत यांनी आज दुपारीच ही बैठक आयोजित केल्याने राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

ट्विट करुन रोहित पवार काय म्हणाले?

मा. उद्योगमंत्री महोदय,

कर्जत-जामखेड MIDC चा प्रश्न मार्गी लागावा यासाठी गेल्या तीन अधिवेशनापासून मी कसोसीने पाठपुरावा करत आहे, परंतु आपण दिलेला शब्दही पाळत नसल्याचं दुर्दैवानं म्हणावं लागतंय. किमान या अधिवेशनात तरी हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी शुक्रवार दिनांक ८ डिसेंबर २०२३ रोजी आपणास पत्र दिलं आणि लक्षवेधीही लावली आहे. तसंच ‘युवा संघर्ष यात्रे’त घेतलेल्या मुद्द्यांमध्ये MIDC च्या मुद्द्याचाही समावेश आहे.

त्यानुसार आपल्या विभागाने याबाबत आज (दि. १२ डिसेंबर २०२३) बैठक आयोजित केली, याबद्दल आपले मनापासून आभार. परंतु या बैठकीसाठी आपण मला आमंत्रित केलं नाही, है दुर्दैव आहे. राजकीय दबावापोटी आपण दुजाभाव करत असून, आपली ही अडचण मी समजू शकतो. परंतु आपली ही कृती म्हणजे ‘कुणाशीही आकस बाळगणार नाही किंवा ममत्वभाव ठेवणार नाही,’ या आपण घेतलेल्या शपथेचा सरळसरळ भंग आहे.

गेल्या साडेचार वर्षांत वेळोवेळी पाठपुरावा करुन MIDC साठीची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया मी पूर्ण करून घेतलीय आणि आता संबंधित फाईलवर केवळ आपली एक अंतिम स्वाक्षरी बाकी आहे. ती स्वाक्षरी आपण केली, तर आज आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या मतदारसंघासाठी मोठं गिफ्ट ठरेल. कारण राज्यात सर्वाधिक MIDC आदरणीय पवार साहेबांनी सुरु केल्या आहेत. शिवाय आपण आज वेगळ्या पक्षात असलात, तरी कधीकाळी आदरणीय पवार साहेबांसोबत राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष म्हणूनही काम केलं आहे. त्यामुळं आपल्या अंतकरणाच्या एका कप्प्यात साहेबांविषयी नक्कीच आदराचं स्थान असेल, यात शंका नाही. म्हणून साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आजच माझ्या मतदारसंघातील MIDC चा प्रश्न मार्गी लावावा, अशी माझ्यासह मतदारसंघातील सर्वच लोकांची अपेक्षा आहे.…

Maratha Reservation : मोठी बातमी! राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचाही राजीनामा

MIDC च्या अनुषंगाने मतदारसंघात नॅशनल हायवे आणि इतरही रस्त्यांचं जाळं विणलं आहे. त्यामुळं केवळ नावापुरती छोटी MIDC न करता, ज्या मोठ्या MIDC साठी माझा पाठपुरावा सुरु आहे… त्याचाच विचार करावा… अन्यथा आपण युवा पिढीच्या भवितव्याशी खेळ खेळताय, असा याचा स्पष्ट अर्थ होईल. त्यामुळं आपण असा क्रूर खेळ खेळणार नाहीत, ही अपेक्षा!

असो!
गेल्या वेळेप्रमाणे यावेळेस बैठकीसाठी निमंत्रितांना साडेचार तास वाट बघायला लावणार नाहीत, अशीही अपेक्षा केली तर ती चुकीची ठरणार नाही!

 

Tags

follow us