Jalgaon Bank Election : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत (Jalgaon Bank Election) भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जामनेर तालुका विकास सोसायटी मतदारसंघातून महाजन यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणारे रघुनाथ सखाराम पाटील यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तांत्रिक कारणास्तव बाद केला होता. या निर्णयाविरोधात पाटील यांनी नाशिक येथील विभागीय सहनिबंधकांकडे दाद मागितली होती. मात्र, सहनिबंधकांनीही त्यांचा अर्ज फेटाळून लावला आहे.
सहनिबंधकांच्या निर्णयानंतर रघुनाथ पाटील यांच्यासमोर न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध आहे. न्यायालयात याबाबत काय निर्णय होतो, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी आणि विभागीय सहनिबंधकांनी अर्ज फेटाळल्याने गिरीश महाजन यांच्या बिनविरोध निवडीची शक्यता अधिक बळावल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.
महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. विरोधकांना एकही जागा मिळणार नाही आणि महायुती सर्वच्या सर्व जागा जिंकेल, असा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला असला, तरी महायुतीच्या नेत्यांना जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला निश्चित करण्यात अद्याप यश आलेले नाही.
जिल्हा बँकेच्या एकूण 21 जागांसाठी येत्या 29 तारखेला मतदान होणार आहे. त्यापूर्वीच तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित जागांसाठी मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, मंत्री गुलाबराव पाटील आणि महायुतीतील प्रमुख आमदारांच्या दोन बैठका पार पडल्या. या बैठका सकारात्मक वातावरणात झाल्या असून, 90 टक्के जागांवर एकमत झाल्याचे महाजन यांनी सांगितले आहे. मात्र, मुक्ताईनगर, पाचोरा-भडगाव आणि चोपडा येथील जागांचा तिढा अद्याप कायम आहे.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा सस्पेन्स वाढला! काँग्रेस नेते वडेट्टीवारांच्या विधानाने आतली बातमी फुटली
मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसे विरुद्ध चंद्रकांत पाटील गट
मुक्ताईनगर मतदारसंघात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे समर्थक विनोद तराळ आणि देवयानी देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटील या दोन्ही नेत्यांनी जिल्हा बँकेची निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. त्यामुळे कोणताही गट माघार घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. परिणामी, मुक्ताईनगरमध्ये महायुतीतील घटक पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सस्पेन्स आणि क्राईमचा अनोखा खेळ मोठ्या पडद्यावर! ‘मिरांडा वॉर्निंग’चा ट्रेलर प्रदर्शित!
पाचोऱ्यातही भाजप-शिंदे गटात संघर्ष
पाचोरा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांचे काका सतीश शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील स्थानिक नेत्यांमधील राजकीय संघर्ष पाहता, या ठिकाणीही माघार घेण्याची शक्यता कमी असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे पाचोरा मतदारसंघातील जागावाटपाचा तिढा सोडविणे महायुतीच्या नेत्यांसाठी आव्हान ठरत आहे.
चोपड्यात भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने
चोपडा मतदारसंघात भाजपचे रोहित निकम आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे घनश्याम अग्रवाल हे उमेदवार आमने-सामने आहेत. या मतदारसंघातील जागावाटपावरही अद्याप अंतिम सहमती झालेली नाही. मंत्री गिरीश महाजन हे जागावाटपाचा तिढा लवकरच सुटेल, असा दावा करत असले, तरी सध्याच्या राजकीय परिस्थितीत त्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे मुक्ताईनगर, पाचोरा आणि चोपडा या मतदारसंघांमध्ये महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता वाढली आहे. जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुती सर्व जागा जिंकण्याचा दावा करत असतानाच, मित्रपक्षांमधील अंतर्गत संघर्षामुळे निवडणुकीचे राजकीय गणित अधिक गुंतागुंतीचे बनलेत. आता अंतिम जागावाटपात महायुतीचे नेते कोणता तोडगा काढतात आणि कोणत्या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढती होतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
