Eknath Khadse : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चर्चेत आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारी पातळीवर कार्यवाही सुरू आहे असे सत्ताधारी गटातील नेते सांगत आहेत. तर दुसरीकडे विरोधकांकडून दबावाचे राजकारण सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आजारपणातून बरे होताच कट्टर विरोधक देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि गिरीश महाजन यांना घेरले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला शब्द दिला आहे. त्यांना शब्द पाळावा. संकटमोचक गिरीश महाजन यांनी मार्ग काढून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे खडसे म्हणाले. खडसे यांनी मंगळवारी जळगावात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
आजारपणातून बरे झाल्यानंतर खडसे पहिल्यांदा मुक्ताईनगर येथे गेले. त्यानंतर जळगावात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी आतशबाजी करत जल्लोषात त्यांचे स्वागत केले. ओबीसी आरक्षणाबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भुमिकेवरही खडसे यांनी भाष्य केले. भुजबळांनी ओबीसींचे प्रश्न कायमच मांडले आहेत. त्यांची ही भुमिका आजची नाही. त्यांनी ओबीसींसाठी मोठा लढा दिला आहे. मात्र हे सगळं करत असताना मराठा समाजाविषयी द्वेष भावना असण्याचं काहीच कारण नाही. आपल्या समाजाविषयी आदर बाळगला पाहिजे पण त्याच वेळी दुसऱ्या समाजाचा दुस्वास असता कामा नये, ही भूमिका राजकारणात जपली गेली पाहिजे, अशी अपेक्षा खडसे यांनी व्यक्त केली.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. यावर बोलताना खडसे म्हणाले, की मराठा समाजाला आज निर्णय घेतो, उद्या निर्णय घेतो असे आश्वासन त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास आपण राजकारण सोडू असा शब्द फडणवीस यांनी दिला होता. आता हा शब्द त्यांनी पाळावा. आता समाजाच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. तेव्हा ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी, असेही खडसे यांनी सांगितले.
दरम्यान, राज्य सरकारने 24 डिसेंबरच्या आता मराठा आरक्षण जाहीर करावे अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही. एक डिसेंबरपासून गावागावात साखळी उपोषण सुरू करा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केले होते.
Manoj Jarange : 24 डिसेंबरच्या आत आरक्षण द्या, अन्यथा.. मनोज जरांगेंचा गंभीर इशारा