अहमदनगर : जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात लव्ह जिहादचे प्रकरण घडले असल्याचा दावा भाजप (BJP) आमदार राम शिंदे (Ram Shinde) आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiyaa) यांनी केला आहे. कर्जतमधील दुरगाव येथील आझीम अकील शेख याने एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण केले आहे, असे ट्विट करत सोमय्या यांनी खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान, कर्जत पोलिसांकडे दाद मागूनही दखल न घेतल्याचा आरोप करत संबंधित मुलीच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालाच्या बाहेर उपोषणाला सुरुवात केली आहे. (Love Jihad Case in Ahmednagar district karjat Tahsil, allegations by ex bjp mp kirit Somaiyaa)
याबाबत संबंधित मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, आमच्या घरातून 22 तारखेला रात्री 1 नंतर मुलगी पळवून नेली आहे. आम्ही कर्जत पोलीस स्थानकात तक्रार दाखल करायला गेल्यानंतर त्यांनी टाळाटाळ केली. तुमच्या पाहुण्यांकडे असेल, शोध घ्या असं सांगतं त्यांनी 2 दिवस टाळाटाळ केली. त्यानंतर त्यांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फिर्याद दाखल केली. मात्र आम्ही संबंधित मुलाचे आणि त्याला मदत केलेल्या नातेवाईंकांचे नाव सांगूनही त्यांनी अद्याप काहीही कारवाई केलेली नाही. आम्हाला आमची मुलगी परत मिळावी अशी मागणीही यावेळी मुलीच्या वडिलांनी केली.
नगर जिल्ह्यात लव्हजिहाद
आझीम अकील शेख (दुरगाव) याने दलित अनुसूचित जातीच्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण केले
मी जालिंदर शिंदे (वडील) आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी बोललो.
कर्जत तहसील मधील आणखी एक मुलगी एप्रिल 2023 मध्ये अशाच प्रकारे बेपत्ता झाली आहे
मी पुढील आठवड्यात कर्जतला जाणार pic.twitter.com/MRShBYEiJd
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 4, 2023
दरम्यान, किरीट सोमय्या यांनी अपहरण झालेल्या मुलीच्या वडिलांशी आणि पोलीस अधीक्षकांशी संवाद साधला. तसंच मी पुढील आठवड्यात (बुधवारी) कर्जतला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी कर्जत तालुक्यातील आणखी एक मुलगी एप्रिल 2023 मध्ये अशाच प्रकारे बेपत्ता झाली होती, असा दावा सोमय्या यांनी केला. तर या उपोषणाची दखल घेत भाजप आमदार राम शिंदे यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. संबंधित व्यक्तीला तातडीने अटक केली जाईल. याबाबत प्रशासनाला आदेश देण्यात आले आहे असे म्हणतच पीडित कुटुंबियांचे सांत्वन शिंदे यांनी केले.