थंड हवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिक (Nashik) जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या कमालीचे तापले आहे. गत महिन्यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी इथे रोड शो केला होता. त्यापाठोपाठ ठाकरे गटाने इथे मेळावा घेत नाशिकवर लक्ष असल्याचा संदेश दिला. सध्या महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे जाणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. तर हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीचीही चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीत शिवसेनेचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर किंवा अजित पवार गटाचे विद्यमान आमदार मानिकराव कोकाटे यांना आयात करुन उमेदवारी देण्यावर खलबत सुरु आहेत.
मात्र त्याचवेळी या सगळ्या नावांसोबतच कुठेही चर्चेत नसलेले एक नाव आता प्रकाशझोतात येत आहे. हे नाव हेमंत गोडसे (Hemant Godse) यांचे टेन्शन वाढविणार असल्याचे बोलले जात आहे. नेमके कोणाचे नाव आहे आणि गोडसेंचे टेन्शन कसे वाढणार आहे, पाहुया. (Mahamandaleshwar Swami Shantigiri Maharaj is preparing to contest from Nashik Lok Sabha constituency.)
वेरुळच्या जनार्धन स्वामी मठाचे मठाधिपती महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज हे पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. नाशिकसह छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. त्यामुळेच महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. शांतीगिरीजी महाराज यांचा छत्रपती संभाजीनगरसह धुळे, जळगाव, नाशिकमध्येही मोठा भक्तपरिवार आहे.
शांतीगिरी महाराज यांनी या आधी 2009 मध्ये छत्रपती संभाजीनगरमधून अपक्ष म्हणून लोकसभेच्या मैदानात उडी घेतली होती.त्यावेळी त्यांनी दीड लाख मते घेत तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळविले होते. त्यांच्या उमेदवारीचा शिवसेनेचे तेव्हाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना मोठा फटका बसला होता. 2004 मध्ये एक लाख 32 हजारांचे मताधिक्य घेणाऱ्या खैरेचे त्यावेळी मताधिक्य अवघ्या 32 हजारांवर आले होते. पण त्यानंतर महाराज काहीसे सक्रिय राजकारणापासून दूर राहिले.
2019 मध्येही महाराजांनी छत्रपती संभाजीनगरमधूनच लोकसभा निवडणुकीची तयारी केली होती. त्यावेळी त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी केल्याची चर्चा होती. पण युती झाल्यानंतर त्यांनी अपक्ष तयारीला सुरुवात केली. जिल्हाभरातील भक्तांशी चर्चाही केली. इतकंच नाही तर निवडणूक कार्यालयातून दोन उमेदवारी अर्ज सुद्धा घेतले होते. मात्र अखेरच्या क्षणी त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. त्यानंतर आता ते पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात परतण्याचा विचार करत आहेत.
देशात रामराज्य आणण्यासाठी आपण निवडणूक लढवत असल्याचा दावा शांतीगिरी महाराज करत आहेत. मात्र भाजप सध्या अनेक अध्यात्मिक आणि धार्मिक नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याच्या तयारीत आहे. त्याचा फायदा आपल्याला होईल या बळावरच शांतिगीरी यांनी तयारी सुरु केली आहे. एकनाथ शिंदे यांनादेखील अशा महाराजांचा पाठिंबा आवश्यक वाटतो आहे. आपण कडवे हिंदुत्ववादी आहोत, हे दाखविण्यासाठी शिंदे हेही महाराजांच्या उमेदवारीचा विचार करत आहेत.
नाशिक जिल्ह्यातील लाखलगाव हे शांतीगिरीजी महाराज यांचे मूळ गाव. पण वयाच्या पंधराव्या वर्षी महाराजांची दृष्टी गेली होती. त्यानंतर ते मठात राहण्यासाठी आले. तिथे आल्यानंतर त्यांची दृष्टी परतली. त्यामुळे ते गावी परतले. पण त्यांची पुन्हा दृष्टी गेली. त्यानंतर ते मठात परतले आणि तिथेच राहु लागले. याच मठात राहून महाराजांनी विज्ञान शाखेचे शिक्षण घेतले.1989 साली जनार्धन स्वामी यांच्या निधनानंतर शांतीगिरी महाराजांची उत्तराधिकारी म्हणून नेमणूक केली. तेव्हापासूनच तेच या माठाचे मठाधिपती आहेत.
आज जनार्धन स्वामी मठाची करोडो रुपयांची संपत्ती आहे. मठाचे देशात 115 आश्रम आणि सात गुरुकुल आहेत. आज घडीला मठाकडे शेकडो एकर जमीन आहे. फक्त वेरूळ मठातच तब्बल 200 एकर जमीन आहे. स्वतः महाराजांकडे एसयूव्ही, टाटा सफारी यांसारख्या महागड्या गाड्या आहेत. काही दिवसांपूर्वीच महाराजांच्या मार्गदर्शनाखाली तपोवनमध्ये धार्मिक अनुष्ठान पार पडले. यावेळीही मोठ्या संख्येने भक्तपरिवार उपस्थित होता. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर होते त्यावेळीही मोदी यांनी महाराजांची भेट घेतली होती. त्यांच्या भेटीचा फोटोही चांगलाच व्हायरल झाला होता. त्यामुळे ते लोकसभेच्या तयारीला लागले आहेत हे तर निश्चित मानले जात आहे