Maharashtra Elections 2024 : ‘१९९५ ते २०१९ पर्यंत मी निवडणूक ही निवडणुकीच्याच पद्धतीने करत आलोय. त्यामुळे आता कोणत्याच प्रकारचा हलगर्जीपणा माझ्याकडून होणार नाही. बारीक सारीक गोष्टींकडेही दुर्लक्ष करणार नाही. म्हणून २३ तारखेला माझा विजय झाल्याचे तुम्हाला पहायला मिळेल’, असा पक्का विश्वास नगर राहुरी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांनी व्यक्त केला. २०१९ च्या निवडणुकीत दुर्लक्ष आणि काहीसा हलगर्जीपणा माझ्या परभवाला कारणीभूत ठरला होता पण आता या गोष्टींना थारा न देता विजयी होण्याच्या दृष्टीने कर्डिलेंनी प्लॅनिंग केलं आहे. लेट्सअप मराठीच्या विशेष कार्यक्रमात त्यांनी अगदी बेधडक मते व्यक्त केली.
राहुरी हा तुमचा मूळ मतदारसंघ नसताना देखील २००९ आणि २०१४ या दोन्ही निवडणुकीत विजय मिळवलात मग २०१९ मध्ये नेमकं गणित कुठं चुकलं? असा प्रश्न विचारला असता कर्डिले म्हणाले, ‘या निवडणुकीआधी लोकसभेची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत सुजय विखेंना ७२ हजारांचा लीड मिळाला होता. चार महिन्यांत फार काही फरक पडेल असं मला वाटत नव्हतं. तसेच माझ्या विरोधात उमेदवारी करायलाही कुणी तयार नव्हतं. पण, शेवटच्या क्षणी त्यांचे (प्राजक्त तनपुरे) मामा (जयंत पाटील) आले आणि त्यांनी बळजबरीने त्यांचा अर्ज भरला. त्यात माझं थोडं दुर्लक्ष अन् हलगर्जीपणा झाला त्यात माझा पराभव झाला.’
आता ही चूक 2024 ला तुम्ही दुरुस्त केली आहे असे विचारल्यावर ‘१९९५ ते २०१९ पर्यंत मी निवडणूक ही निवडणुकीच्याच पद्धतीने करत आलोय. त्यामुळे आता कोणत्याच प्रकारचा हलगर्जीपणा माझ्याकडून होणार नाही. बारीक सारीक गोष्टींकडेही दुर्लक्ष करणार नाही. म्हणून २३ तारखेला माझा विजय झाल्याचे तुम्हाला पहायला मिळेल’, असाे कर्डिलेंनी स्पष्टपणे सांगितले.
मी दहशत, दादागिरी करतो असं जनता म्हणत नाही, हे काम फक्त नेतेमंडळी करतात; शिवाजीराव कर्डिले
लोकसभा निवडणुकीत राहुरी मतदारसंघातून सुजय विखेंना जे लीड मिळायला पाहिजे होतं ते झालं नाही याचं कारण काय? असे विचारल्यावर कर्डिले म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी कारणं घडली होती. फक्त राहुरीच नाही तर देशभरातच अशी परिस्थिती होती. विरोधी लोक अपप्रचारात यशस्वी झाले. लोकांत चुकीचा प्रचार करून त्यांचा गैरसमज निर्माण करून देण्याचे काम सातत्याने केलं. त्याचा फटका राहुरीत बसला.’
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बहुमत जवळ नसतानाही अध्यक्ष झालात अशी कोणती जादूची कांडी फिरवलीत यावर बोलताना कर्डिले म्हणाले, ‘जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मी कोणतीच जादूची कांडी फिरवली नाही. मागील पंधरा वर्षांपासून मी जिल्हा बँकेचा संचालक आहे. बँकेचे जे काही निर्णय व्हायचे त्यात सहभागी होण्याचं काम मी करायचो. सर्व घटकांना मदत करण्याची भूमिका मी सातत्याने घेत आलो. त्यानंतर सगळ्या संचालकांच्या मनात आलं की जर आपण यांना चेअरमनपदाची संधी दिली तर आपल्याला मदत होईल या भावनेतून सर्वांनी मला सहकार्य केलं.
पण जेव्हा तुम्ही चेअरमन झाले त्यावेळी तनपुरेंच्याच कारखान्याचा फंड तुम्ही अडवला असा आरोप तुमच्यावर होतोय. या प्रश्नावर कर्डिलेंनी प्राजक्त तनपुरेंवर तोफ डागली. ‘अडवणूक करण्यापेक्षा मदत करण्याचीच भूमिका घेतली होती. पण आता त्यांनीच कारखाना तोट्यात घातलाय. ३०० कोटी रुपयांच्या तोट्यात कारखाना त्यांनी घातला. आता त्याचं खापर माझ्यावर फोडून काहीच उपयोग नाही.’, अशी टीका कर्डिलेंनी तनपुरेंवर केली.
२००९ मध्ये तुम्ही राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली आणि सहा महिन्यांनंतर लगेचच भाजपात गेले याचं काय कारण होतं? कर्डिले म्हणाले, ‘लोकसभा निवडणूक काळात स्व. राजीव राजळे काँग्रेसमध्ये गेले होते. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होती. त्यावेळी त्यांनी अपक्ष निवडणूक केली त्यात माझा पराभव झाला होता. या पराभवानंतर मी शरद पवार आणि अजित पवार यांना सांगितलं होतं की आता तुम्ही मला राहुरी विधानसभा मतदारसंघातून तिकीट द्या. परंतु, त्यांनी नकार दिला. विधानपरिषदेसाठी विचार करू असं सांगितलं. पण विधानपरिषदेसाठी संधी मिळेल असं काही मला वाटत नव्हतं. नंतर मी भाजपात गेलो. येथे स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांनी मला उमेदवारी दिली आणि राहुरीच्या जनतेनं मला आमदार केलं.’