Maharashtra Elections : राज्याच्या विधानसभा निवडणुकीची लढाई आता हळूहळू स्पष्ट होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांनी उमेदवारी याद्या जाहीर केल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही उमेदवारांची यादी जाहीर केली होती. आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर झाली. त्यानंतर थोड्याच वेळात काँग्रेस पक्षानेही दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या यादीत अनेक बदल दिसत असले तरी एक बदल उठून दिसणारा आहे. श्रीरामपूर मतदारसंघात काँग्रेसने धक्कातंत्राचा वापर केला आहे. विद्यमान आमदार लहू कानडे यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. त्यांच्या जागी पक्ष संघटनेतील हेमंत ओगले यांना संधी मिळाली आहे.
Ground Zero : श्रीरामपूरात महाभारत.. लहु कानडेंभोवती महायुतीचा चक्रव्यूह!
राज्यात बहुधा लहू कानडे पहिलेच आमदार असावेत ज्यांना पुन्हा संधी मिळालेली नाही. श्रीरामपूर मतदारसंघात काँग्रेसने हा निर्णय का घेतला याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. येथील काँग्रेस पक्षाची परिस्थिती, संघटनेतील स्थानिक पातळीवरील विसंवाद यांसारखी काही कारणे आहेत का याचीही चर्चा होत आहे. कारण कोणत्याही परिस्थितीत तिकीट आपल्यालाच मिळणार असा विचार करून तयारी करत असलेल्या आमदाराचेच तिकीट कट होणे ही धक्कदायकच बाब म्हणावी लागेल.
मतदारसंघात आमदार लहू कानडे यांनी स्थानिक पातळीवर जुळवून घेतलं नाही. येथील स्थानिक नेत्यांशी असलेला सुप्त संघर्ष या नकारात्मक बाबींची परिणती लहू कानडे यांचं तिकीट कटण्यात झाली अशी चर्चा आता या मतदारसंघात सुरू झाली आहे. लहू कानडे यांच्याऐवजी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव हेमंत ओगले यांना संधी देण्यात आली आहे. या मतदारसंघात तिकीटाची मागणी त्यांनी मागील वेळीही केली होती. मात्र त्यांना संधी मिळाली नाही. आता मात्र पक्षाने त्यांचा विचार केला आहे.
श्रीरामपूर मतदारसंघातील विद्यमान आमदार लहू कानडे यांना काँग्रेस उमेदवारी डावलली. हेमंत ओगले काँग्रेसचे अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याने श्रीरामपुरातील करण ससाने गटात आनंदाचे वातावरण आहे. ओगले हे मूळ श्रीगोंद्याचे आहेत. खासदार राहुल गांधी यांची मैत्री हेमंत ओगले यांना कामी आल्याचे सांगितले जात आहे.
काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; 50 खोके एकदम ओके फेम गोरंट्याल यांच्यासह 23 उमेदवारांची घोषणा
काँग्रेसने श्रीरामपूरमधून हेमंत ओगले यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता महायुतीच्या उमेदवारीकडे लक्ष लागले आहे. शिवसेनेकडे असलेल्या या जागेसाठी भाजपने जोरदार आग्रह धरला आहे. ज्येष्ठ पत्रकार, भाजपचे श्रीरामपूर उपाध्यक्ष मिलिंदकुमार साळवे यांचे नाव स्थानिक आणि सर्व समावेशक उमेदवार म्हणून भाजपच्या गोटात आघाडीवर आहे. महायुतीत श्रीरामपूरच्या जागेचा घोळ अजूनही सुरूच आहे. त्यामुळे आता महायुती या मतदारसंघात कुणाला संधी देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.