Download App

लाडके बहीण-भाऊच सरकारला धडा शिकवतील; प्राजक्त तनपुरेंचा थेट इशारा

लाडके भाऊ-बहीण सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे.

अहिल्यानगर : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील लाडक्या भावांना तीन महिन्यांपासून वेतन नाही. लाडकी बहीण योजना बंद केली. तिजोरीत खडखडाट असताना लाडक्या भाऊ-बहिणींना गाजर दाखविण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. महागाई वाढवून दिलेले परत घ्यायचे काम सुरू आहे. लाडके भाऊ-बहीण सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी (Prajkt Tanpure) दिला आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील कर्मचाऱ्यांनी (मंगळवारी) सायंकाळी आमदार तनपुरे यांच्यासमोर व्यथा मांडली. यावेळी योजनेतील कर्मचाऱ्यांसह तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन दिल्यावर आमदार तनपुरे बोलत होते. तनपुरे पुढे म्हणाले, “राहुरी तालुक्यात १५० तरुण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत अत्यंत तुटपुंज्या वेतनावर काम करीत आहेत. ते कंत्राटी पद्धतीने जुलै व ऑगस्ट महिन्यात कामावर रुजू झाले. तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती, तहसील कार्यालय येथे काम करीत आहेत. त्यांची हजेरी पाठविली. परंतु तीन महिन्यांपासून त्यांना वेतन दिलेले नाही.

Prajakta Tanpure : भाजपची गळती थांबेंना…राहुरीत तनपुरेंचे राजकीय बळ वाढले

निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून घाईत केलेल्या योजनांचा तरुणांना मनस्ताप होत आहे. तरुणांना गाजरं दाखवून त्यांचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न महायुती सरकारने चालविला आहे. श्रावणबाळ, संजय गांधी निराधार अशा योजना आचारसंहितेत चालू आहेत. परंतु निवडणुकीच्या तोंडावर आणलेली लाडकी बहीण योजना आचारसंहितेचे कारण पुढे करून बंद केली. वास्तविक निवडणूक आयोगासमोर बाजू मांडायला राज्य सरकार तरबेज आहे. धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळतं. घड्याळ चिन्ह अजित पवार यांना मिळतं.

प्रत्येक निर्णय राज्य सरकारच्या बाजूने लागतो. मात्र लाडकी बहीण योजना चालू करायला सरकार कमी पडत असेल तर शंका येते. तिजोरीत खडखडाट असताना लाडके भाऊ लाडक्या बहिणींना गाजरं दाखविण्याची काम सरकार करीत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर किराणा सामानाच्या महागाईचा भडका उडविला आहे. एका हाताने द्यायचे, दुसऱ्या हाताने घ्यायचे चालू आहे. लाडके बहीण-भाऊ हुशार आहेत. ते सरकारला धडा शिकवतील, असेही तनपुरे यांनी सांगितले.

आईच्या पराभवाचा वचपा काढला आणि थेट मंत्री; प्राजक्त तनपुरेंचा राजकीय प्रवास

follow us