Download App

विखेंकडून ईव्हीएमवर शंका! ‘या’ कुटुंबाला पराभवच मान्य नाही, लंकेची सडकून टीका

विखे कुटुंबाला पराभव मान्यच नसल्याची सडकून टीका खासदार निलेश लंके यांनी केलीयं. दरम्यान, सुजय विखे यांनी ईव्हीएमवर शंका घेत तपासणीची मागणी केलीयं. त्यावर लंके माध्यमांशी बोलत होते.

Nilesh Lanke On Sujay Vikhe : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी महायुतीचे उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe) यांचा पराभव करत विजय मिळवलायं. खासदार निलेश लंके यांनी जवळपास 30 हजार मतांची लिड घेत विजय खेचून आणला आहे. पराभवानंतर आता माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्याकडून ईव्हीएम मशीनवर शंका घेण्यात येत असल्याचं दिसून येतंय. विखेंकडून ईव्हीएम मायक्रो कंट्रोलर तपासणीची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आलीयं. त्यावर बोलताना खासदार लंके यांनी विखेंवर सडकून टीका केलीयं. या कुटुंबाला पराभवच मान्य नसल्याची टीका निलेश लंके यांनी केलीयं.

Video : विखे आमच्या जिल्ह्याचे नेते मी अभिमानाने सांगतो; लंकेंकडून विखेंच्या कौतुकांचे गोडवे

निलेश लंके म्हणाले, निवडणूक प्रक्रिया मी पाहिली मात्र ही निवडणूक प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे पार पडली. अधिक उशीरा निकाल हा नगर दक्षिण मतदारसंघाचा लागलेला आहे. याचाच अर्थ असा की, एक-एक पेपर त्या संबंधित अधिकाऱ्यांनी अनेकदा तपासले आहेत. या सर्व गोष्टींची शहानिशा केली कारण यामागे महत्त्वाचे कारण देखील होते. ज्यांच्या विरोधात मी निवडणूक लढलो ते या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, महसूल मंत्री आहेत. ही निवडणूक यंत्रणा बऱ्यापैकी महसूल यंत्रणेच्या ताब्यात होती, असा आरोप लंके यांनी केलायं.

तर निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी काम पाहिले, त्यांच्या खालोखाल उपजिल्हाधिकारी असून निवडणूक निर्णय अधिकारी असो तहसीलदार असो या सर्वांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. सर्व अधिकाऱ्यांनी अत्यंत काटेकोरपणे मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली. समोरील उमेदवारांनी आरोप केला असेल तर वास्तविक पाहता राजकारणामध्ये पराभव मान्य करायला शिकले पाहिजे, असा खोचक टोला निलेश लंके यांनी लगावलायं.

NDA सरकारचं शेतकऱ्यांना गिफ्ट; भात, कापसासह 14 पिकांच्या एमएसपी दरात मोठी वाढ

पराभव मान्य नाही आम्हाला म्हणून तुम्ही या चुकीच्या गोष्टी करतात. तुमच्या पक्षाचे सरकार दहा वर्षांपासून आहे आणि तुम्हीच आरोप करता. आजही देशात तुमचे सरकार आहे आणि सत्तेत असताना तुम्हीच तुमच्या सरकार विरोधात आरोप करतात, असाच हा प्रकार आहे अशीही टीका निलेश लंके यांनी केलीयं.

विखे कुटुंबियांना पराभव मान्यच नाही…
ही दुसऱ्यांदा घटना घडली असून विखे कुटुंबियांना पराभव मान्यच नाही, असाच हा प्रकार दिसून येतोय. काही करा काही होत नसतं कारण ही निवडणूक काय मी हजार पाचशेच्या मतांनी निवडून आलेले नाही. तीस हजार मतांच्या फरकाने मी आलो आहे, तरी चाळीस पन्नास हजार माझी मतं ही पिपाणीला गेली असं देखील यावेळी बोलताना लंके म्हणाले आहेत.

विखेंनी काय मागणी केलीयं?
कार्यकर्त्यांच्या आग्रही मागणीमुळे आम्ही ईव्हीएम मशीनची मायक्रो कंट्रोलर तपासणीची मागणी निवडणूक आयोगाकडे करीत आहोत. ही मागणी केवळ आमच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे करीत आहोत. कोणत्याही उमेदवाराला निकाल लागल्यानंतर 7 दिवसांच्या आत एकूण ईव्हीएम मशीनच्या 5 टक्के मशीनची मायक्रो कंट्रोलर तपासणी आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करता येते, असं सुजय विखे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय.

follow us