Download App

लहामटेंची दोनच दिवसात पलटी; शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांच्या गटात…

अहमदनगर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठिंबा दिलेल्या आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दोन दिवसांतच पलटी मारली आहे. लहामटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला असल्याची माहिती आहे. याबाबत आमदार लहामटे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही आहे. मात्र सध्या अकोले तालुक्यात सुरु असलेल्या चर्चा पाहता लहामटे यांनी अजित दादांच्या गटाला साथ देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे. (Ncp Mla Kiran Lahamte return to dcm Ajit Pawar camp)

राष्ट्रवादीमधील बंडानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात आमदारांची मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरु आहे. यातच नगर जिल्ह्यातील आमदार निलेश लंके, संग्राम जगताप यांनी अजित पवार यांच्या गटाला साथ दिली आहे. लहामटे हेही सुरुवातीला अजित पवारांसोबत असल्याचे सांगण्यात येत होते. त्यांनी अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थिती लावली होती. मात्र शरद पवार हे आमचे दैवत आहेत. त्यामुळे मी त्यांच्याबरोबर आहे, असं म्हणतं त्यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचं स्पष्ट केलं होतं.

शिंदे गटाचा विरोध धुडकावला, अजितदादाच अर्थमंत्री? सरकारी ‘जीआर’मध्ये भलतीच खेळी!

किरण लहामटे हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याचे आमदार आहे. 2019 साली त्यांनी भाजपच्या वैभव पिचड यांचा पराभव केला होता. ते सुरुवातीपासूनच अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते. मात्र अकोला मतदारसंघात शरद पवारांना माननारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. अहमदनगर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर हे अजितदादा गटाचे मानले जातात. आपल्या मतदारसंघातील जनमानस आणि स्थानिक राजकारण बघता लहामटे यांनी शरद पवारांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात होते.

मात्र आता त्यांनी अजित पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. लहामटे आणि अजितदादा यांच्यात अहमदनगरमधील एका राष्ट्रवादीच्या जुन्या आणि निष्ठावंत नेत्याने मध्यस्थी केल्याची चर्चा आहे. हा नेता मागील 3 दिवसांपासून अकोले येथे ठाण मांडून बसला होता. या 3 दिवसात अजितदादा व लहामटेंमध्ये संपर्क करुन देत मध्यस्थाची भूमिका बजावत होता. अखेर शनिवारी मध्यरात्रीच रात्री लहामटे आणि हा नेता मुंबईत अजितदादांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी अजितदादांना पाठिंबा जाहीर केला.

वर्ध्यात शरद पवार गटाला खिंडार! माजी केंद्रीय मंत्र्याने धरला अजित पवारांचा हात…

राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यानंतर निर्माण झालेल्या दोन गटांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील आमदार देखील विभागले गेले होते. यामध्ये निलेश लंके, संग्राम जगताप यांनी अजित पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला होता. तर रोहित पवार, प्राजक्त तनपुरे आणि किरण लहामटे हे शरद पवार गटात सामील झाले होते. दरम्यान लहामटे यांच्या या बदलत्या भूमिकेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरणात चांगलेच ढवळून निघाले आहे.

Tags

follow us