Lok Sabha 2024 : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील यंदाची निवडणूक चांगलीच गाजण्याची (Lok Sabha 2024) चिन्हे दिसत आहे. एकतर या मतदारसंघाचे विद्यमान खासदार भाजपाचे सुजय विखे आहेत. तर दुसरीकडे हा मतदारसंघ भाजपाकडून हिसकावण्याची तयारी शरद पवार गटाकडून सुरू झाली आहे. त्यामुळे सुजय विखेंना टक्कर देऊ शकेल असा उमेदवार शोधला जात आहे. यातूनच राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांचे नाव पुढे आले आहे. पारनेरचे आमदार निलेश लंके अजित पवार गटात गेल्याने त्यांचे नाव मागे पडले आहे. नगर लोकसभा मतदारसंघासाठी दावेदारी वाढू लागली आहे. विद्यमान खासदार सुजय विखे यांच्याविरोधात सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच आता शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे (Prajkt Tanpure) यांचेही नाव पुढे येत आहे. या चर्चांवर स्वतः आमदार तनपुरे यांनीच उत्तर देत या चर्चांना पूर्णविराम दिला.
काल आमदार तनपुरे नगर शहरात होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी त्यांना लोकसभा निवडणुकीत उतरणार का?, असा प्रश्न विचारला. त्यावर तनपुरेंनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. तनपुरे म्हणाले, आमच्यासाठी पक्ष सर्वस्वी असून त्यांचा आदेश देखील आमच्यासाठी महत्वाचा आहे. पक्षाने सांगितले तर मी लोकसभा निवडणूक लढवेल.
नगरमधून सुप्रिया सुळे, तनपुरे म्हणाले माहिती नाही
आगामी काळात लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यानुषंगाने राजकीय पक्ष व उमेदवार हे मतदार संघाची चाचपणी करत आहे. नगर दक्षिण लोकसभेसाठी भाजपकडून सुजय विखे हे उमेदवार असू शकतील. तर राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान सुळे या नगरमधून लोकसभा लढवणार का? याबाबत आमदार प्राजक्त तनपुरे यांना विचारण्यात आले असताना त्यांनी स्पष्टच उत्तर दिले. नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादी पक्ष (शरद पवार गट) लढवणार आहे. तर सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा याबाबत मला तरी अद्याप काही कल्पना नाही असे प्रतिपादन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिले.
नगर दक्षिण लोकसभेसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. यातच सध्या खासदार सुजय विखे हे विद्यमान खासदार आहेत तर आगामी काळात भाजपकडून खासदारकीसाठी विखेंच पक्षाचा चेहरा असू शकतात, असे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून देखील दक्षिणेसाठी उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाकडून आमदार निलेश लंके यांचे नाव चर्चेत होते मात्र लंके हे सध्या अजित पवार गटात असून ते महायुतीमध्ये आहे. यामुळे शरद पवार गटाकडून दुसऱ्या उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. यातच सुप्रिया सुळे यांचे नाव नगर दक्षिणेसाठी चर्चेत होते.
यावर आमदार तनपुरे यांना विचारण्यात आले असताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादी लढणार हे आम्ही याआधीच स्पष्ट केले आहे. तसेच सुप्रिया सुळे नगर दक्षिणमधून लढणार याबाबात मला तरी अद्याप काही कल्पना नाही असेही तनपुरे यांनी स्पष्ट केले.