Manikrao Kokate : राज्य सरकारमधील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा (Manikrao Kokate) अडचणीत सापडले आहेत. नाशिक जिल्हा बँकेतील अनियमितते प्रकरणी कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांच्यासह जिल्ह्यातील चार आमदार आणि खासदार अशा एकूण 25 संचालकांच्या अडचणी वाढल्या आहेत. बँकेच्या 347 कोटींच्या कर्जवितरण प्रकरणात 182 कोटींची अनियमितता झाल्याचा ठपका तत्कालीन विभागीय सहनिबंधक गौतम बलसाने यांच्या चौकशी समितीने ठेवला होता.
परंतु, तत्कालीन सहकारमंत्र्यांनी या कारवाईला दिलेल्या स्थगितीबाबत न्यायालयाने विचारणा केली होती. त्यानंतर आता या प्रकरणात पुन्हा कारवाईला सुरुवात झाली आहे. आता सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 152 अन्वये दाखल अपील अर्जावर सुनावणी घेण्याची नोटीस बजावली आहे. आता या नोटीसवर 2 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.
बँकेचे तत्कालीन संचालक आणि अधिकाऱ्यांनी 347 कोटींचे अनियमित कर्जवितरण केल्याच्या तक्रारी आलेल्या होत्या. यानंतर तत्कालीन जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी या तक्रारींची चौकशी केली होती. या प्रकरणी तब्बल अडीच वर्षे चौकशी चालली होती. या चौकशीनंतर 29 आजी माजी संचालक आणि 15 अधिकारी अशा एकूण 44 जणांवर 182 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी जबाबदारी निश्चित करण्यात आली होती. आता या लोकांकडून ही रक्कम वसूल करण्याची तयारी सहकार विभागाने केली आहे.
पुढे या प्रकरणात स्थगिती मिळवण्यासाठी संचालकांनी तत्कालीन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे धाव घेतली होती. परंतु, त्यांनी या प्रकरणी स्थगिती देण्यास नकार दिला होता. त्यामुळे या संचालकांच्या अडचणी वाढल्या होत्या. आता या सर्व 44 आजी माजी संचालकांना रकमेच्या वसुलीसाठी नोटीसा बजावल्या होत्या. यानंतरही संचालकांनी राजकीय दबाव आणत सहकार मंत्र्यांकडून स्थगिती मिळवली होती.
परंतु आता न्यायालयानेच या प्रकरणी सहकार विभागाने कारवाई करावी असे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार सहकार विभागाने तत्काळ कार्यवाही करत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, डॉ. शोभा बच्छाव, आमदार नरेंद्र दराडे, दिलीप बनकर, डॉ. राहुल आहेर, राहुल ढिकले यांच्यासह 26 जणांना 2 एप्रिल रोजी सुनावणीसाठी सहकार मंत्र्यांकडे हजर राहा अशा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
न्यायालयाच्या निकालावर संशय म्हणजे मूर्खपणा..माणिकराव कोकाटे संतापले, विरोधकांकडून राजकीय षडयंत्र
कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे (1.87), खासदार डॉ. शोभा बच्छाव (2.11), आ. नरेंद्र दराडे (8.89), दिलीप बनकर (8.65), डॉ. राहुल आहेर (0.43), अॅड. राहुल ढिकले (8.76), माणिकराव शिंदे (0.67), देवीदास पिंगळे (8.65), राजेंद्र भोसले (8.78), राघो अहिरे (8.89), सुचेता बच्छाव (2.11), चंद्रकांत गोगड (1.32), दत्ता गायकवाड (0.67), नानासाहेब पाटील (8.78), राजेंद्र डोखळे (8.89), जेपी गावित (7.21), माणिकराव बोरस्ते (7.02), धनंजय पवार (7.57), शिरीषकुमार कोतवाल (1.98), वैशाली कदम (8.54), वसंत गिते (1.89), गणपतराव पाटील (8.89), संदीप गुळवे (7.57)