Download App

काय सांगता! चक्क पोलिसच निघाला चोर; जळगाव पोलिसांनी अटक करुन फोडलं बिंग

चोपडा बसस्थानकात काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढीस लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांत भीतीचे वातावरण होते.

Jalgaon News : पोलिसांचं काम काय सोप्याच शब्दांत सांगायचं झालं तर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचं. पण जर हेच समाजाचे रक्षक म्हणवणारे पोलीस लोकांना मनस्ताप देणारे काम करू लागले तर.. पोलीस दलाची नाचक्की होईल असे उपद्यव्याप करू लागले तर.. चोरी करू लागले तर.. ऐकायला थोडं वेगळं वाटेल पण हेच सत्य करणाऱ्या घटना घडत आहेत. ताजी घटना जळगाव जिल्ह्यातील चोपड्यातील आहे. चोपडा बसस्थानकावर चोरी करुन परत जात असताना जळगाव पोलिसांनी चक्क एका पोलीस उपनिरीक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. हा नेमका काय प्रकार आहे? पोलीस अधिकारी का चोरी करतोय? या मागे काय कारण आहे? सगळंच समजून घेऊ या.. 

खरंतर हा प्रकार चोपडा बसस्थानकावर घडला आहे. बसस्थानकावर चोऱ्या होणे या काही नवीन घटना नाहीत. बसस्थानक मग ते कुठलेही असो भुरटे चोर चोऱ्या करतातच. प्रवाशांचे खिशातील रक्कम गायब करणे, महिलांचे दागिन चोरणे अशा चोऱ्या येथे होतात. या चोऱ्यांवर नियंत्रण ठेऊन चोरांचा बंदोबस्त करण्याचं काम पोलिसांचं आहे. पोलिसांकडून त्यांचं कर्तव्य केलं जातंही पण, चोपडा बसस्थानकात नेमका उलटा प्रकार घडला आहे.

वृद्धाने 28 लाख गमावले, पोलिसांनी 22 लाख मिळवून दिले; बुलढाण्यात धक्कादायक डिजीटल अरेस्ट स्कॅम!

पोलीस दलात सेवानिवृत्तीला काही महिनेच शिल्लक राहिलेले असताना हा पोलीस उपनिरीक्षक टोळीसह बसस्थानकात चोरी करत होता.  दोन दिवसांपूर्वी बसस्थानकातून चोरी करुन परत जात असतानाच जळगाव पोलिसांनी पाठलाग करुन त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी काही दिवसांपसून त्याच्यावर पाळत ठेवली होती. माहितीची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले. विशेष म्हणजे, या पोलीस उपनिरीक्षकाने आपण चोरी करत असल्याचे कबुलही केले आहे.

प्रल्हाद पिरोजी मान्टे असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी मान्टेसह आणखी चार चोरांना ताब्यात घेतलं आहे. बुधवारी (16 एप्रिल) चोपडा बसस्थानकावर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील एका शेतकऱ्यांची 35 हजारांची रोकड चोरीला गेली. यानंतर पोलिसांनी तत्काळ हालचाली करत चार जणांना ताब्यात घेतले. या चोरट्यांकडून एक चारचाकी कार आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.

चोपडा बसस्थानकात काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढीस लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांत भीतीचे वातावरण होते. या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात होती. पोलिसांसमोरही या चोऱ्या रोखण्याचं आव्हान होतं. याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनाही तयारी केली. चोपडा पोलीस आणि जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने बसस्थानक परिसरात पाळत ठेवण्यास सुरुवात केली. याच चोरी करुन परत जात असताना चार जणांना पोलिसांनी चोपडा-धरणगाव रस्त्यावर पाठलाग करुन बेड्या ठोकल्या. या पकडलेल्या चार जणांत पोलीस उपनिरीक्षक मान्टे देखील होता.

Jalgaon Accident Video : जळगावजवळ रेल्वेची मोठी दुर्घटना; अनेकांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

एकूणच पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखले. तत्काळ हालचाली केल्या. त्यामुळे चोरांची टोळी गजाआड झाली. पण, यात पोलीस देखील चोरी करत होता. हाच प्रकार सर्वात धक्कादायक ठरला. ज्या पोलिसांकडे कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम असतं त्याच पोलिसांनी चोरी करावी, आता चोरांऐवजी पोलिसांवरच नजर ठेवण्याची वेळ येऊ नये म्हणजे मिळवलं अशा जोरदार चर्चा पूर्ण जळगाव जिल्ह्यात सुरू आहेत.

follow us