वृद्धाने 28 लाख गमावले, पोलिसांनी 22 लाख मिळवून दिले; बुलढाण्यात धक्कादायक ‘डिजीटल अरेस्ट’ स्कॅम!
देशभरात सायबर क्राइमच्या घटना वाढीस लागल्या आहेत. सायबर भामट्यांकडून वेगवेगळ्या आयडीया वापरून नागरिकांची फसवणूक केली जाते. फसवणुकीच्या या प्रकारात आता डिजीटल अरेस्टची भर पडली आहे. ऑनलाइन व्हिडिओ कॉल करून लोकांना धमकावून, टॉर्चर करून लाखो रुपये उकळले जातात. असाच धक्कादायक प्रकार बुलढाण्यात घडला आहे. एक वयोवृद्ध व्यक्ती पंधरा दिवस डिजीटल अरेस्ट जाळ्यात अडकून राहिला. स्वतःच्या कष्टाचे 28 लाख 30 हजार रुपये गमावून बसला. नंतर सायबर पोलिसांना हा प्रकार समजला. पोलिसांनी तत्परता दाखवत हालचाली केल्या आणि या वृद्धाला 22 लाख 50 हजार रुपये परत मिळवून दिले. एखाद्या सिनेमातील स्टोरीप्रमाणेच पण, खरी घटना घडली. हा नेमका काय प्रकार आहे हे थोडक्यात समजून घेऊ..
वृद्ध असा झाला डिजीटल अरेस्ट
याबाबत बुलढाणा सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी एक तक्रार मिळाली होती. एक वयोवृद्ध व्यक्ती बुलढाणा शहरात त्याच्या शेतीची कागदपत्रे घेऊन फिरत होता. एका व्यक्तीने त्याला पोलीस ठाण्यात आणले. शेती का विकता असे विचारले असता मला घरी जायचं आहे आणि मी डिजीटल अरेस्ट (Digital Arrest) झालो आहे, असे त्याने सांगितले.
Pune News : टास्क फ्रॉडच्या जाळ्यात पुणेकर; तब्बल 27 कोटी रुपये गमावले
हा काहीतरी वेगळाच प्रकार असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी त्या व्यक्तीला विश्वासात घेत त्याच्याकडे आणखी चौकशी केली. यानंतर या व्यक्तीने जी माहिती दिली ती धक्कादायकच होती. या व्यक्तीला काही दिवसांपूर्वी मुंबई क्राइम ब्रँचमधून बोलत असल्याचा फोन सायबर भामट्यांनी केला होता. या व्यक्तीच्या मोबाइलवरून काही प्रतिष्ठित नागरिकांना अश्लील छायाचित्रे पाठवण्यात आली होती. तसेच मनी लाँड्रिंग केल्याचाही बनाव करण्यात आला होता. या व्यक्तीसाठी हा मोठा धक्काच होता.
जवळपास पंधरा दिवस त्याला या प्रकाराने हैराण केले होते. या काळात हा व्यक्ती तब्बल 28 लाख 30 हजार रुपये गमावून बसला होता. या प्रकारातून बाहेर पडायचं असेल तर आणखी पैशांची मागणी त्याला करण्यात आली होती. याच पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी तो बुलढाण्यात फिरत होता. सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर सर्वात आधी सायबर पोलिसांनी या व्यक्तीची तक्रार दाखल करून घेतली. जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली.
पोलिसांनी 22 लाख रुपये परत मिळवले
यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात तपासाची चक्रे फिरवण्यात आली. या व्यक्तीने ज्या ज्या बँक खात्यात पैसे पाठवले होते. ते सर्व बँक खाते गोठवण्यात आले. या प्रक्रियेतून वृद्धाचे 22 लाख 50 हजार रुपये परत मिळवण्यात आले. बाकीचे पैसे परत मिळवण्यासाठीही पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. यातील आरोपी कोण आहेत याचाही शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांनी दिली.
मुंबईतील धक्कादायक घटना; नारायण राणेंच्या नावाचा वापर करुन 45 लाखांची झाली फसवणूक
एकूणच पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखले. तत्काळ हालचाली केल्या. त्यामुळे या वयोवृद्ध नागरिकाची किमान 22 लाखांची रक्कम परत मिळवता आली. या कामगिरीसाठी बुलढाणा सायबर पोलिसांचे नागरिकांतून कौतुक होत आहे. सध्या डिजीटल अरेस्ट, शेयर मार्केट ट्रेडींगच्या नावावर लोकांना भुर्दंड घालणाऱ्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्म पासून सावध राहा असे आवाहन सायबर पोलीसांनी केले आहे. अशा प्रकारे जनसामान्यांबरोबर सायबर फ्रॉड झाल्यास आपली तक्रार तत्काळ नोंदवा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
काय आहे डिजीटल अरेस्ट?
डिजीटल अरेस्ट एक सायबर स्कॅम आहे. यात समोरून फोन करणारा व्यक्ती कधी पोलीस अधिकारी, सीबीआय, नार्कोटिक्स, आरबीआय अधिकारी असल्याचे सांगतो. अत्यंत आत्मविश्वासाने बोलतो. व्हॉट्सअप किंवा स्काइप कॉल कनेक्ट झाला की समोरील व्यक्ती अधिकारीच असल्याचे दिसते. नंतर हाच माणूस धमकावण्यास सुरुवात करतो. तुम्ही काहीतरी मोठा गुन्हा केलाय किंवा तुमच्या नातेवाईकांबाबत काहीतरी वाईट घडणार आहे अशी बतावणी केली जाते. त्यामुळे लोक घाबरून अशा भामट्यांच्या जाळ्यात फसतात.
आणखी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर डिजीटल अरेस्टमध्ये बनावट सरकारी अधिकारी बनून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून लोकांना धमकावून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली जाते.