Rahuri By-Election-राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी प्रचाराच्या (Rahuri By-Election) फैऱ्या आज थंडविल्या असून, जाहीर प्रचार मंगळवारी सायंकाळी बंद झाला आहे. आता मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे.मतदारांना सुरक्षित व निर्भयपणे मतदान करता यावे यासाठी सर्व 374 मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीतील एक अत्यंत महत्त्वाचा व नाविन्यपूर्ण बदल म्हणजे, मतदान कर्मचाऱ्यांना ईव्हीएम (EVM) व साहित्यासाठी मुख्यालयात एकत्र येण्याची गरज नाही. त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवरच थेट साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. आतापर्यंत मुख्यालयातून निवडणूक कर्मचारी हे इव्हीएम व इतर साहित्य घेऊन शासकीय वाहनातून मतदान केंद्रात जात होते.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, उप जिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके यांच्या मार्गदर्शनाखाली व निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांच्या देखरेखीखाली या निवडणूक प्रक्रियेचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. वेळ व श्रमाची बचत व्हावी यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सर्व मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 22 एप्रिल रोजी सकाळी थेट त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवरच पोहोचायचे आहे. ईव्हीएम मशीन आणि इतर सर्व आवश्यक मतदान साहित्य क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत (Sector Officers) थेट या मतदान केंद्रांवरच पोहोच केले जाणार आहे. तसेच, मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे साहित्य पुन्हा केंद्रावरूनच क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे जमा करावयाचे आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत 36 पोलीस अधिकारी, 708 पोलीस कर्मचारी आणि ३९१ होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) ची एक तुकडी आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाची (CRPF) एक प्लाटून सुरक्षेसाठी पाचारण करण्यात आली आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेत पारदर्शकता राहावी यासाठी सर्व 374 मतदान केंद्रांवर ‘वेबकास्टिंग’ द्वारे थेट लक्ष ठेवले जाणार आहे.
मतदार ओळखपत्र नसलेल्या नागरिकांनाही आपला हक्क बजावता यावा, यासाठी भारत निवडणूक आयोगाने 12 पर्यायी कागदपत्रांना मान्यता दिली आहे. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, बँक किंवा पोस्ट ऑफिसचे छायाचित्रयुक्त पासबुक आदींचा समावेश असून यापैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार आहे.
3 लाख 33 हजार मतदार
मतदारसंघातील 1 लाख 72 हजार 231 पुरुष, तसे 1 लाख 61 हजार 312 महिला मतदार आणि 02 इतर मतदारांनी २३ एप्रिल रोजी लोकशाहीच्या या उत्सवात हिरीरीने सहभाग नोंदवून जास्तीत जास्त मतदान करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रत्येक नागरिकाने आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती टाळावी आणि निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच निवडणुकीत सर्व पात्र मतदारांनी उर्त्स्फूतपणे सहभागी हाेउन मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांनी केले आहे.
