Rohit Pawar on Ram Shinde : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने आणि अराजकीय पद्धतीने साजरी व्हावी ही, सर्वांचीच इच्छा असते. आजवर हा जयंती उत्सव नेहमीच राजकीय पद्धतीने साजरा केला गेला परंतु गेल्या वर्षीची जयंती आम्ही मोठ्या उत्साहाने आणि लोकांना अपेक्षित असल्याप्रमाणे पूर्णतः अराजकीय पद्धतीने साजरी केली होती. गतवर्षीप्रमाणे यंदाही जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यासाठी आम्ही चोख नियोजन केलं होतं. त्यासाठी प्रशासनाकडे परवानगी मागितली असता राजकीय दबावाखाली काम करणाऱ्या प्रशासनाकडून या कार्यक्रमास परवानगी नाकारली गेली, असे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
रोहित पवार म्हणाले की मागील वर्षी आम्ही चौंडी इथं सर्वसमावेशक पद्धतीने जयंतीचा कार्यक्रम साजरा केला आणि असं करत असताना इतर कुणालाही आडकाठी आणली नाही. अनेकजण तर जयंतीच्या नावाखाली केवळ राजकीय नौटंकी करण्यासाठी आले होते, परंतु त्यांनाही रोखलं नाही. पण आज सरकार त्यांचं असल्याने कार्यक्रमावर आपलीच छाप असावी, या राजकीय स्वार्थासाठी प्रशासनावर दबाव आणून हेच लोक परवानगी प्रशासनाला नाकारायला भाग पाडतात आणि पुन्हा हेच लोक पत्रकार परिषद घेऊन मी यंदा कार्यक्रम का घेत नाही, असा हास्यास्पद प्रश्न विचारतायेत. पण असो! अशा प्रवृत्तींकडं दुर्लक्ष करणंच योग्य ठरेल.
विखेंची तीनदा पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली मात्र…राम शिंदेंनी व्यक्त केली खंत
ते पुढं म्हणाले की पण प्रशासनाने परवानगी नाकारली असली तरी कुठल्याही परिस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती साजरी करण्यावर व शोभायात्रा काढण्यावर आम्ही सर्वजण ठाम होतो आणि तसं प्रशासनास सूचितही केलं होतं. ‘जयंतीच्या कार्यक्रमात काही समाजकंटक जाणूनबुजून खोडा घालून सामाजिक तणाव निर्माण करण्याच्या प्रयत्नात असल्याचं’ सांगत आपण 31 मे रोजी जयंती साजरी न करण्याची’ विनंती प्रशासनाने आम्हाला केली. मुळात म्हणजे महान कर्तृत्त्वाला वंदन करण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरजच नसावी. त्यामुळे प्रशासनाची परवानगी नसती तरी आम्ही कार्यक्रम घेतलाच असता. पण त्या समाजकंटकांचा हेतू साध्य होऊ नये, यासाठी प्रशासनाला सहकार्य करणं, हे आमचं कर्तव्य आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी नेहमीच प्रजेला केंद्रस्थानी ठेवत राज्यकारभार केला आणि सदैव सार्वजनिक हितालाच प्राधान्य दिलं. त्यांच्या याच विचारांवर चालणाऱ्या आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांचा प्रशासनाच्या विनंतीमुळं नाईलाज झाला. कधीकधी सर्वसामान्यांचं व्यापक हीत लक्षात घेत स्वार्थी विचारांसमोर सार्वजनिक विचारांना माघार घ्यावी लागते. म्हणूनच आम्ही सर्वांनी 31 मे रोजीच्या कार्यक्रमात बदल करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार 31 मे ऐवजी आदल्या दिवशी म्हणजेच 30 मे रोजी रात्री 9 ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत महापूजा आणि सात नद्यांच्या व बारवांच्या पवित्र तीर्थाने जलाभिषेक केला आहे तर 31 तारखेला देशभरातून आलेल्या भाविकांसाठी विश्रांतीची व्यवस्था, महाप्रसादाचं आयोजन, आरोग्य व्यवस्था आणि इतर आवश्यक त्या सर्व सेवा उपलब्ध करणार आहोत, असे रोहित पवार यांनी सांगितले आहे.
…तर मी रोहित पवारांचे मनापासून स्वागत करेल, ‘त्या’ वादावर राम शिंदेंची प्रतिक्रिया
ते पुढं म्हणाले की सर्वसामान्य जनता साजरा करत असलेल्या जयंतीच्या कार्यक्रमास शासनाच्या माध्यमातून परवानगी नाकारत आधुनिक ‘राघोबा दादां’नी वेढा टाकला असला तरी आमच्या सर्वांच्या मनात घट्टपणे रुजलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवींची शिकवण या आजच्या राघोबा दादांना कदापि रोखता येणार नाही. चांगलं कार्य करत असताना अहिल्यादेवींना नेहमीच गंगोबा तात्या, राघोबा दादा यासारख्या स्वार्थी प्रवृत्तींचा सामना करावा लागला. आजही अशा अनेक प्रवृत्ती समाजात वावरत असल्या तरी या प्रवृत्तींचा सामना कसा करायचा याची शिकवण पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या विचारांना मानणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
जयंती कोणी साजरी केली यापेक्षा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या सर्वसमावेशक तेजस्वी विचारांचा अधिकाधिक प्रचारप्रसार झाला पाहिजे हेच आम्हा सर्वांचं उद्दिष्ट आहे आणि त्यासाठीच समर्पण भावनेने निस्पृहपणे आपण काम करत राहू. सर्वांना अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मनापासून शुभेच्छा आणि 30 तारखेच्या महापूजेच्या कार्यक्रमास उपस्थित रहावं. तसंच 31 मे रोजी होणाऱ्या शासकीय कार्यक्रमासही आपला पाठींबा असून या कार्यक्रमासाठीही आपण सर्वांनी उपस्थित रहावं ही विनंती, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.