अहमदनगर : राहता तालुक्यात सध्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. हा कारखाना भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या ताब्यातून घेण्यासाठी काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांनी कंबर कसली आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे देखील स्वतः या निवडणुकीत लक्ष घालणार असल्याचे सांगितले जात आहे. (Sangram Kote Patil will be the face for ncp in Ganesh Shakari Sugar factory election)
अशात बाळासाहेब थोरात यांचे भाचे थेट अजित पवार यांच्यासाठी काम करणार असल्याची माहिती आहे. बाळासाहेब थोरात यांचे भाचे असलेले संग्राम कोते पाटील हे अजित पवार यांचे देखील निकटवर्तीय समजले जातात. याशिवाय ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. ते आता गणेश कारखान्याच्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार असून ते अजित पवार यांचे कान, नाक अन् डोळे होणार असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीसाठी त्यांना अजित पवार यांच्याकडून ताकद आणि रसद मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना संग्राम कोते पाटील म्हणाले, आर्थिक दृष्ट्या संकटात सापडलेल्या गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पूर्ण ताकतीने लढविणार आहे. मागील ८ वर्षात कारखान्याचा तोटा 25 कोटी हून 110 कोटीवर गेला आहे. काका रामचंद्र कोते पाटील हे गणेश सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक 3 वेळेचे संचालक होते. तर वडील अॅडव्होकेट शिवाजीराव कोते पाटील हे 25 वर्ष संचालक होते.
सभासदांशी होणारी लूट आणि पिळवणूक रोखण्याचे आमच्या पुढील लक्ष असून कुठल्याही परिस्थितीत गणेश कारखान्यावर विरोधकांचे आक्रमण होऊ देणार नाही. पुढचा गळीत हंगाम यशस्वी करण्याचे आमच्या पुढील उद्दिष्ट असून गणेशा सभासदांनी आमच्याकडे सत्ता दिल्यास कुठल्याही परिस्थितीत पुढील हंगाम यशस्वी करून दाखवू असे देखील संग्राम कोते पाटील यांनी यावेळी नमूद केले.