पिचड पिता-पुत्रापाठोपाठ अजित पवार देणार विखे पाटलांना धक्का? मोर्चेबांधणीला सुरुवात
अहमदनगर : अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्यातुन ज्येष्ठ नेते मधुकर पिचड (Madhukar Pichad) यांची तब्बल ३ दशकांची सत्ता उलथवून टाकल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची नजर आता अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्यावर आहे. गणेश सहकारी साखर कारखान्याची नुकतीच निवडणूक जाहीर झाली आहे. सध्या इथे भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची सत्ता आहे. हा कारखाना विखे पाटलांकडून घेण्यासाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासोबतच अजित पवारही मैदानात उतरणार असल्याची माहिती आहे. (NCP Leader Ajit Pawar Will involve in Ganesh Shakari Sugar factory election)
गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असून सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. गणेश सहकारी साखर कारखान्यावर माजी मंत्री शंकर कोल्हे आणि शिवाजीराव कोते पाटील यांची अनेक वर्षे सत्ता होती. मात्र, गेल्या काही वर्षांपूर्वी हा कारखाना विखे पाटील यांनी ताब्यात घेतला. पण आता हा कारखाना पुन्हा एकदा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात घेण्यासाठी बड्या नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यात अजित पवार यांचे नाव आघाडीवर आहे.
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वर मंदिराचे शुद्धीकरण, महाराष्ट्र बंदची हाक
संग्राम कोते पाटील अजितदादांचे कान-नाक अन् डोळे :
दरम्यान, या निवडणुकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि अजित पवार यांचे खंदे समर्थक संग्राम कोते पाटील हे अजित पवार यांचे कान-नाक अन् डोळे ठरणार आहेत. कोते पाटील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे देखील आहेत. आर्थिक दृष्ट्या संकटात सापडलेल्या गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पूर्ण ताकतीने लढविणार असल्याचे संग्राम कोते पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, मागील ८ वर्षात कारखान्याचा तोटा 25 कोटी हून 110 कोटीवर गेला आहे.
कोते पाटील पुढे म्हणाले, काका रामचंद्र कोते पाटील हे गणेश सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक 3 वेळेचे संचालक होते. तर वडील अॅडव्होकेट शिवाजीराव कोते पाटील हे 25 वर्ष संचालक होते. सभासदांशी होणारी लूट आणि पिळवणूक रोखण्याचे आमच्या पुढील लक्ष असून कुठल्याही परिस्थितीत गणेश कारखान्यावर विरोधकांचे आक्रमण होऊ देणार नाही. पुढचा गळीत हंगाम यशस्वी करण्याचे आमच्या पुढील उद्दिष्ट असून गणेशा सभासदांनी आमच्याकडे सत्ता दिल्यास कुठल्याही परिस्थितीत पुढील हंगाम यशस्वी करून दाखवू असे देखील त्यांनी यावेळी नमूद केले.
त्र्यंबकेश्वर मंदिरातील ‘त्या’ घटनेप्रकरणी गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
अगस्तीसाठी अजितदादांची रणनीती :
सप्टेंबर २०२२ मध्ये अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली. यात अजित पवार यांनी जातीने लक्ष घातले होते. त्यावेळी त्यांनी अगस्ती आणि आजूबाजूच्या भागात येऊन प्रचार सभा घेतल्या होत्या. एकदा निवडणूक पुढे ढकलली गेली. पण त्यानंतरही पिचड पिता-पुत्राकडून सत्ता काबीज करण्यास अजित पवार यांच्या नेतृत्वातील पॅननला यश आले. त्यानंतर आता पुन्हा एकदा अजित पवार विखे पाटील यांच्याकडून गणेश कारखान्याची सत्ता काढून घेण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.