Download App

नाशकात ठाकरे गटाला सुरुंग! चार दिवसांपूर्वी पद दिलेला ठाकरेंचा नेताही भाजपने फोडला, गुन्हा दाखल होताच..

उद्धव ठाकरेंनी मामा राजवाडे यांना महानगरप्रमुख पदाची जबाबदारी दिली होती. आता तेच राजवाडे भाजपाचा झेंडा हाती घेणार आहेत.

Nashik Political News : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Nashik Political News) जवळ आल्या आहेत. यातच महाविकास आघाडीला मोठी गळती लागली आहे. नाशिकमध्ये तर भाजपने ठाकरे गटाला अक्षरशः सुरुंग लावला आहे. दिग्गज आणि जनाधार असणारे नेते एका मागोमाग एक महायुतीत प्रवेश करत आहेत. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर, माजी मंत्री बबनराव घोलप यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर विलास शिंदे यांनी धनुष्यबाण हाती घेतला. आता उद्धव ठाकरेंना (Uddhva Thackeray) धक्का देणारी आणखी एक घडामोड नाशकात घडणार आहे. विलास शिंदे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मामा राजवाडे यांना महानगरप्रमुख पदाची जबाबदारी दिली होती. आता तेच राजवाडे भाजपाचा झेंडा हाती घेणार आहेत.

मामा राजवाडे यांना महानगरप्रमुख पदाची मोठी जबाबदारी उद्धव ठाकरेंनी दिली होती. यानंतरच खऱ्या राजकारणाला सुरुवात झाली. जबाबदारी मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी एका मारहाण प्रकरणात मामा राजवाडे आणि सुनील बागूल यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. हे दोन्ही नेते त्याठिकाणी उपस्थितही नव्हते असे सांगितले जाते. मात्र तरीही पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन शोध सुरू केला होता. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी दोघेही फरार झाले होते.

ठाकरे बंधू एकत्र आल्यास काँग्रेसचं काय? पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, दोघांनी..

आता हेच राजवाडे भाजपात प्रवेश करणार आहेत. राजवाडे यांच्यासोबत आणखीही काही नेते भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका सीमा ताजणे, कमलेश बोडके, प्रशांत दिवे आज भाजपात प्रवेश करणार आहेत. शरद पवार गटाचे गणेश गीते देखील आजच भाजपात दाखल होणार आहेत.

या पक्ष प्रवेशाबाबत गुप्तता पाळण्यात आली होती. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या अनेक बैठका झाल्या होत्या. या बैठकीत पुढील रणनिती ठरवण्यात आली. त्यानुसार या नेत्यांना आजच भाजपात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आज (गुरुवार) दुपारी मुंबईतील भाजप मुख्यालयात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, या पक्षप्रवेशावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपवर जोरदार टीका केली आहे. भारतीय जमवाजमव पार्टीची कमाल आहे. आधी शिवसेना पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले. सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले. पोलीस अटक करतील म्हणून सगळे फरार झाले. क्लायमॅक्स असा की हे सगळे फरार आज भाजपात प्रवेश करत आहेत. जमवा जमव पार्टीने महाराष्ट्राची वाट लावली आहे. सत्ता, पैसा, दहशत! दुसरे काही नाही!

आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी; कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल

follow us