नाशिक : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते अद्वय हिरे यांना मध्य प्रदेशमधील भोपाळमधून अटक करण्यात आली आहे. मालेगाव येथील रेणूका सहकारी सूत गिरणीसाठी जिल्हा बँकेकडून घेतलेले कर्ज न फेडल्यामुळे त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला होता. पण त्यानंतर ते बेपत्ताच होते.
अखेर ऐन दिवाळीत पोलिसांनी मोबाईल लोकेशन ट्रेस करत त्यांना भोपाळमधून अटक केली आहे. अद्वय हिरे हे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यांच्यारुपाने ठाकरे गटाला भुसे यांच्या बंडखोरीनंतर नाशिक, मालेगाव पट्ट्यात तगडा राजकीय पर्याय उभा राहिला असल्याचे सांगण्यात येत होते. (Advay Hire has been arrested from Bhopal in Madhya Pradesh)
दशकभरापूर्वी मालेगाव येथील रेणूका सहकारी सूत गिरणीसाठी नाशिक जिल्हा बँकेने साडे सात कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. अद्वय हिरे बँकेचे संचालक असतानाच हे कर्ज मंजूर झाले होते. याप्रकरणी बँकेकडून वसुलीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. या काळात कर्जाची रक्कम 32 कोटी रुपयांपर्यंत पोहचली. शिवाय कर्ज घेताना बोगस कागदपत्र घेतल्याचाही आरोप करण्यात आला होता. या सगळ्या प्रकरणानंतर हिरे यांच्याविरोधात मालेगाव तालुक्यातील रमझानपुरा पोलीस ठाण्यात शाखेचे विभागीय अधिकारी गोरख जाधव यांनी फसवणुकीची तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीच्या आधारे एप्रिल महिन्यात पोलिसांनी हिरे यांच्यासह 29 जणांविरोधात कलम 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला होता. पण त्यानंतर ते बेपत्ताच होते. अखेर ऐन दिवाळीत पोलिसांनी मोबाईल लोकेशन ट्रेस करत त्यांना भोपाळमधून अटक केली आहे. दरम्यान, अद्वय हिरे यांना अटक झाल्यानंतर डॉ.अपूर्व प्रशांत हिरे यांनी राजकीय कारवाई असल्याचे म्हंटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मविआच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी माध्यमांशी बोलताना केला.