अहिल्यानगर: छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणारे गड–किल्ले आजही दुर्लक्षित अवस्थेत आहेत. ऐतिहासिक वारशाची होत असलेली ही दुरवस्था मन सुन्न करणारी असून, गड संवर्धनासाठी सातत्याने पाठपुरावा करत राहणार असल्याचा ठाम निर्धार खासदार निलेश लंके (MP Nilesh Lanke) यांनी व्यक्त केला.
खासदार लंके यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या ‘आपला मावळा’ या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून गड संवर्धन, जतन, स्वच्छता व वृक्षारोपण मोहिमेचा दहावा टप्पा आज ऐतिहासिक साल्हेर गडावर (Salher Fort) यशस्वीरीत्या पार पडला. (Shivaji maharaj fort is still neglected; This situation is mind-numbing, regrets MP Nilesh Lanke)
या मोहिमेत खासदार भास्कर भगरे यांच्यासह शेकडो मावळ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. गडावरील प्लास्टिक कचरा, बाटल्या, थर्माकोल यांसारखा अपायकारक कचरा संकलित करून परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच गडावरील ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन, पायवाटांची साफसफाई व ठिकठिकाणी सौरदिवे व पर्यटकांना बसण्यासाठी बेंच तसेच नामफलक लावण्यात आले.
यावेळी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले, शिवरायांचे गड म्हणजे केवळ दगड-माती नव्हे, तर तो आपला स्वाभिमान, इतिहास आणि अस्मिता आहे. या गडांची आजची अवस्था पाहून मन हेलावून जाते. सरकार, प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन गड संवर्धनासाठी पुढाकार घेतला पाहिजे. ‘आपला मावळा’च्या माध्यमातून हा लढा थांबणार नाही. खासदार भास्कर भगरे यांनीही मोहिमेचे कौतुक करत गड-किल्ले जपण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असल्याचे सांगितले.
ही मोहीम केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित नसून, युवा पिढीमध्ये इतिहासाबाबत जाणीव निर्माण करणे आणि शिवरायांचा वारसा जपण्याचा संदेश देणारी असल्याचे उपस्थित मावळ्यांनी सांगितले.
