Ahilyanagar Politics : नव्या वर्षाची सुरुवात ठाकरे गटासाठी (UBT) धक्क्यांची ठरली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच ठाकरे गटाला एका पाठोपाठ धक्के बसत आहेत. आताही राजकीय धक्का देणारी मोठी बातमी अहिल्यानगरमधून (Ahilyanagar) समोर आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला (Shiv Sena) अहिल्यानगरमध्ये मोठं खिंडार पडलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या (Municipal elections) पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक दत्ता जाधव (Datta Jadhav), दीपक खैरे, प्रशांत गायकवाड यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
मोठी बातमी! बच्चू कडूंनी दिला दिव्यांग मंत्रालयाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, काय आहे नेमकं कारण?
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याच्या राजकीय वर्तुळात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. आता उद्धव ठाकरे गटाला अहिल्यानगरमध्ये मोठा धक्का बसला आहे. तीन माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. माजी नगरसेवक दत्ता जाधव, माजी नगरसेवक दीपक खैरे, माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड यांनी ठाकरे गटाच्या कार्यपद्धतीवर नाराज होत पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. जिल्हाप्रमुख अनिल शिंदे आणि शहर प्रमुख सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला.
गत महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अहिल्यानगर मतदारसंघाची जागा गेली 25 वर्षापासून शिवसेनेकडे असताना देखील खासदार संजय राऊत यांनी ही जागा शरद पवार पक्षाला दिल्याने एकनिष्ठ शिवसैनिक नाराज झाले होते. याच नाराजीतूनच त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचं बोलल्या जातंय.
अहिल्यानगर शहरावर 25 वर्ष सेनेची सत्ता…
दरम्यान, अहिल्यानगर शहरावर गेली 25 वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची सत्ता होती. गेली पंचवीस वर्ष हिंदूधर्म रक्षक स्वर्गीय अनिल राठोड हे अहिल्यानगर शहराचे आमदार म्हणून निवडून आले होते. कोरोना काळात त्यांच्या निधनानंतर अहिल्यानगर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये शिवसैनिकांचे एकमेकांमध्ये एक मत न राहिल्याने अनेक शिवसैनिक नाराज होते. त्यातच शिवसेना पक्ष फुटल्यानंतर शिंदे गट शिवसेनेमध्ये माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी नगरसेवक अनिल शिंदे, अनिल लोखंडे सचिन जाधव यांनी प्रवेश केला होता.
दरम्यान, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी ठाकरे गटाकडून सुरू आहे. तर दुसरीकडे पक्षाला मात्र गळती लागलीये. आता या माजी नगरसेवकांच्या प्रवेशाने अहिल्यानगर शहरातील उद्धव ठाकरे शिवसेनेला मोठे खिंडार पडले असून आता शहरातील उरलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शिवसैनिक काय भूमिका घेतात? हे येणाऱ्या काळामध्ये पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..