Wrestling Competition In Ahmednagar : शहरात तब्बल दीड कोटी रुपये खर्च करुन होत असलेल्या राज्यस्तरीय छत्रपती शिवराय केसरी निमंत्रीत कुस्ती स्पर्धा होणार आहे. 20 ते 23 एप्रिल दरम्यान शहरातील वाडीयापार्क मैदानावर ही स्पर्धा रंगणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने भारतीय जनता पार्टी, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने कुस्त्यांचा थरार नगरकरांसह कुस्तीप्रेमींना अनुभवता येणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या मल्लास हॉलमार्क असलेली 24 कॅरेटची अर्धा किलो सोन्याची गदा (किंमत सुमारे 35 लाख) जीएसटीच्या बीलासह बक्षीस स्वरुपात देण्यात येणार आहे.
ही स्पर्धा माती व गादी विभागात 48, 57, 61, 65, 70, 74, 79, 86 किलो वजन गटात होणार आहे. तर अंतिम छत्रपती शिवराय केसरी ओपन गट सोन्याच्या गदेसाठी 86 ते 135 किलो वजनगटात रंगणार आहे. विविध वजन गटातून विजयी होवून पुढे आलेल्या मल्लांमधून अंतिम कुस्ती लाल मातीच्या आखाड्यात होणार आहे. 48, 57, 61, 65, 70, 74 या वजन गटातील पहिल्या तीन क्रमांकाच्या मल्लांना अनुक्रमे 1 लाख, पन्नास हजार व तीस हजार रुपये तसेच 79, 86 किलो वजन गटातील पहिल्या तीन क्रमांकाच्या मल्लांना अनुक्रमे 1 लाख 25 हजार, 75 हजार व 50 हजार रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे..नगर शहराच्या वैभवात भर पडेल अशी भव्यदिव्य ही स्पर्धा होत आहे..
स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी 21 एप्रिलला सायंकाळी 5 वाजता भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेचे स्वागताध्यक्ष माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे असून, यावेळी खासदार डॉ. सुजय विखे, खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार बबनराव पाचपुते, आमदार मोनिका राजळे, अर्जुनवीर पुरस्कार वीजेते पैलवान काका पवार, महाराष्ट्र केसरी पै. गुलाबराव बर्डे, पै. अशोक शिर्के, पै.संदीप भोंडवे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यानिमित्त नगर शहरातून सकाळी स्पर्धेत सहभागी झालेल्या मल्लांची उंट व घोड्यांवरून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे तीन दिवस चालणार्या या कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत रविवारी 23 एप्रिलला होणार असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विजेत्या मल्लास सोन्याची गदा देण्यात येणार आहे.
आमदारांच्या नावाचे बनावट शिक्के, लेटर पॅड…नगरमधील धक्कादायक प्रकार उघड
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या कार्यक्रमास राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे, उद्योग मंत्री उदय सामंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शिवसेनेचे सचिव संजय मोरे आदींसह भाजप व शिवसेनेचे राज्यस्तरावरील दिग्गज नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेसाठी राज्यातून सुमारे बाराशे पैलवान येणार असून, तब्बल दहा महाराष्ट्र केसरी यामध्ये उतरणार आहेत. यामध्ये खास आकर्षण असलेले पैलवान सिकंदर शेख, माऊली कोकाटे, महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, पृथ्वीराज पाटील, हर्षवर्धन सदगीर, महेंद्र गायकवाड, बाला रफिक यांच्यासह जिल्ह्यातील नामवंत मल्ल स्पर्धेत सहभागी होणार आहेत.