Uddhav Thackeray On Nishikant Dubey : राज्यात सध्या भाषा वादावरुन चांगलेच राजकारण तापले आहे. या प्रकरणात मनसे आणि ठाकरे गटाकडून राज्य सरकारवर टीका होताना दिसत आहे. या प्रकरणात 5 जुलै रोजी वरळी डोम येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) आणि मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विजय मेळावा साजरा करत राज्य सरकारवर टीका केली आहे. यानंतर भाजप (BJP) खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी शिवसेना आणि ठाकरे गटावर टीका करत हिम्मत असेल तर माहिम येथे राहणाऱ्या आणि उर्दू बोलणाऱ्यांना मारहाण करावी असे आव्हान त्यांनी केले होते तर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा परिसरात माध्यमांशी बोलताना खासदार निशिकांत दुबे यांना प्रत्युत्तर दिले आहे. आमचा भाषेला विरोध नाही तर सक्तीला विरोध आहे. अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात मराठी हीच राज्य भाषा आहे आणि या भाषेसाठी जे जे करता येईल ते आम्ही करणार. भाजपचा राजकारण तोडा फोडा आणि राज्य करा असं आहे त्यामुळे त्यांच्या बुडाला आग लागणारच आहे. भाजप लोकांची घरं फोडूनच राजकारण करते त्यामुळे भाजपला मिरच्या लागणं सहाजिक आहे. असं माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले.
तर खासदार निशिकांत दुबे यांना प्रत्युत्तर देत राज्यात बाहेरची लोकं आग लावण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी त्यांचे घरे बघावी. आम्ही आमच्या राज्यात जात, पात, धर्म न पाहता लोकांची सेवा करत आहे. महाराष्ट्रात सगळे आनंदाने राहत आहे. असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर देखील टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आमच्या आंदोलनाला पहलगाम हल्ल्याशी जोडणारे खरे मराठी भाषेचे मारेकरी आहे. भाजप मराठी माणसांसोबत अन्याय करणाऱ्यांची बाजू घेते. मूळ भाजप पक्ष कधीच मेला आहे. भाजपचं राजकारण विकृत आणि हिणकस आहे. तसेच पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी कुठे गेले त्यांना शिक्षा कधी मिळणर. पहलगामचे अतिरेकी भाजपमध्ये गेले की काय? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित करत आमचा विरोध भाषेला नाही सक्तीला आहे अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली.
अंबानींचं मोठं पाऊल! चीनला दणका, भारत प्लास्टिकचे जागतिक केंद्र बनणार
नेमकं काय म्हणाले होते खासदार निशिकांत दुबे
टाटा, बिर्ला आणि रिलायन्स सर्व करदाते हिंदी भाषिक आहेत. तुम्ही कोणताही कर भरत नाही. आमच्या पैशांवर जगता हिंमत आहे तर हिंदीप्रमाणे उर्दु, तमिळ, तेलुगू भाषिकांना मारून दाखवा. युपी, बिहार किंवा तमिळनाडूला या तुम्हाला आपटून आपटून मारू असं भाजप खासदार निशिकांत दुबे म्हणाले होते.