मुंबई- समृद्धी महामार्गानंतर (Samruddhi Mahamarg) आता राज्यात आणखी एक परिवहन क्रांती होणार आहे. समृद्धीनंतर आता राज्यातल्या शक्तिपीठांना जोडणारा 760 किलोमीटरचा शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग (Shaktipeeth Mahamarg)बांधला जाणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) प्रस्तावित केलेला हा महामार्ग 13 जिल्ह्यांतून जाणार आहे.
या महामार्गाने रेणुका माता (Renuka Mata), तुळजाभवानी (Tuljabhavani) आणि महालक्ष्मी (Mahalaxmi) या शक्तिपीठांना जोडले जाणार आहे. त्याचबरोवर सेवाग्राम आश्रम, औंढा नागनाथ, नांदेड गुरुद्वारा, परळी-वैजनाथ, पंढरपूरसह पत्रादेवी या धार्मिक स्थळांपर्यंतचा प्रवास सुकर होणार आहे.
कसा असेल शक्तिपीठ महामार्ग?
शक्तिपीठ महामार्गाची सुरुवात विदर्भातील वर्धा (Wardha) येथून होणार असून तो सिंधुदुर्ग-गोवा (Sindhudurg) सीमेवरील पत्रादेवी येथे संपणार आहे.
तसेच 760 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असणार आहे. तसेच वर्धा येथून हा मार्ग ‘समृद्धी’मार्फत नागपूरला जोडण्यात येईल. नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा 12 जिल्ह्यातून हा मार्ग जाणार आहे.
विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असे चार विभाग या महामार्गाने जोडले जाणार आहेत. या महामार्गासाठी अंदाजे 75 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
नागपूर-गोवा प्रवास 11 तासांत शक्य होणार
सध्या नागपूर ते गोवा (Nagpur-Goa)अंतर रस्तेमार्गाने पार करण्यासाठी 21 ते 22 तास लागतात. तसेच हे अंतर 1 हजार किमीपेक्षा अधिक आहे. मात्र शक्तिपीठ महामार्ग पूर्ण झाल्यानंतर हे अंतर 760 किलोमीटरवर येणार असून नागपूर-गोवा प्रवास 11 तासांमध्ये कापणे शक्य होणार आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतमालाला कोकणची बाजारपेठ सहज उपलब्ध होऊ शकणार आहे.
शक्तिपीठ महामार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यास आणखी दीड ते दोन वर्ष लागणार आहेत. समृद्धी महामार्गाचे सर्व काम पूर्ण होण्यास आणखी काही महिने लागणार आहे. समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर शक्तिपीठ महामार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचा राज्य रस्ते विकास महामंडळाचा मानस आहे.