मोठी बातमी : ठाकरेंचा ढाण्यावाघ राऊतांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड; दोन महिने घेणार ‘राजकीय ब्रेक’
आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले.
 
          Sanjay Raut Letter On His Health Update : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सार्वजनिक आयुष्यापासून दोन महिने दूर राहणार असल्याचे स्वतः राऊतांनी कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. अचानक प्रकृतीत गंभीर स्वरूपाचे बिघाड झाल्याने बाहेर जाणे, गर्दीत मिसळण्यावर मर्यादा आल्याचे राऊतांनी (Sanjay Raut) म्हटले आहे. राऊतांना नेमकं काय झालं आहे याबाबतचा खुलासा त्यांनी केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला असून, उद्याच्या (दि.1) महाविकास आघाडीच्या सत्याच्या मोर्चाला संजय राऊत उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले जात आहे. त्याशिवाय दररोज सकाळी होणारी राऊतांची पत्रकार परिषददेखील होणार नसल्याचे समोर येत आहे. ऐन मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी राऊतांची तब्येत बिघडल्याने ठाकरे गटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) October 31, 2025
राऊतांचं पत्र नेमकं काय?
आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या. कळावे.
आपला नम्र,
(संजय राऊत)
पत्रकार परिषद संपताच राऊतांना केलं होतं अॅडमीट
काही दिवसांपूर्वी संजय राऊत नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेतली होती. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना लुंडमधील फोर्टीस रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याआधी म्हणजे 2020 मध्ये राऊतांची अँजिओप्लेस्टी करण्यात आली आहे. तेव्हापासून राऊत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आरोग्य तपासणी करत आहेत.


 
                            





 
		


 
                         
                        