Download App

Onion Price :  कांद्याला नाही तर रोटाव्हेटरला तरी अनुदान द्या, पंतप्रधान मोदींना पोस्टाने कांदा पाठवत शेतकऱ्यांची मागणी

  • Written By: Last Updated:

कांद्याचे दर कोसळल्यामुळे  महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटातून जात आहे. शेतकऱ्यांना कवडीमोल दरात कांदा विकावा लागत आहे. त्यामुळे सरकाराला जाग यावी यासाठी शेतकरी संघटनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टाद्वारे कांदा पाठवला आहे. तर गळ्यात कांद्याचे हार घालून शेतकऱ्यांनी ही गांधीगिरी पद्धतीने सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला आहे.

काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील राजेंद्र चव्हाण यांनी आपला 512 किलो कांदा 1 रुपयाप्रमाणे विकला होता. त्याचे बिल 1 रुपये दराप्रमाणे 512 रुपये झाले. यातून हमाली, तोलाई, भाडे, रोख उचल यासाठी त्यातील 509.51 रुपये कपात करत शेतकऱ्याला केवळ 2 रुपयांचा चेक देण्यात आला होता. तोही पंधरा दिवसांनी वटणार होता.

हेही वाचा : Onion Price : भाव नाही म्हणून कांद्याची होळी; रोहित पवार म्हणतात, “सरकार दौऱ्यावर, राज्य वाऱ्यावर”

तर रोटाव्हेटरला तरी अनुदान द्या

सध्या बाजारात शेतकऱ्यांना फक्त एक रुपयापासून सहा रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.त्यामुळे सरकार कांद्यासाठी अनुदान देऊ शकत नसेल तर शेतकऱ्यांना रोटाव्हेटर घेण्यासाठी अनुदान द्या, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक

दरम्यान नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले असून कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने कांद्याची होळी पेटवलेली आहे. या शेतकऱ्याने पंधरा दिवसांपूर्वी कांदा अग्निडाग समारंभ आयोजित केल्याची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या समारंभास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील निमंत्रण देण्यात आले होते.

आज होळीच्या दिवशी सरकारच्या धोरणाला वैतागून या शेतकऱ्याने तब्बल दीड एकरावरील कांद्याला अग्निडाग दिला आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. शेतकऱ्यांचे जगणे सरकारला मान्य नाही. उत्पादकांनी कष्टाने पिकवलेला कांदा जाळून टाकला आहे. आजचा दिवस काळा दिवस आहे. शेतकरी जगला काय आणि मेला काय सरकारला देणे- घेणे नसल्याचे सांगत शेतकऱ्याने व्यथा मांडली.

Tags

follow us