Onion Price : भाव नाही म्हणून कांद्याची होळी; रोहित पवार म्हणतात, “सरकार दौऱ्यावर, राज्य वाऱ्यावर”
“घाम गाळून पिकवलेल्या कांद्याला ₹२-३ इतका मातीमोल भाव मिळाल्याने, निराश झालेला शेतकरी अश्रू गाळत कांद्याची होळी करतोय. शेतकऱ्यांच्या घामाची-अश्रूंची जाणीव ठेवून,सरकारने तातडीने अनुदान जाहीर करावं.” अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे नाशिकमधील शेतकऱ्यांनी आज कांदा पिकाची होळी केली, त्यावरून रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे.
कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे येवला तालुक्यात शेतकऱ्यांनी आज कांद्याची होळी करत राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असताना सरकार मात्र फक्त घोषणांचा पाऊस पाडत असल्याचे आरोप शेतकऱ्यांनी केले. बाजार समितीत येऊन नाफेडकडून कांद्याची खरेदी केली जाईल असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विधानसभेत म्हणाले. मात्र आठवडा उलटून गेला तरी नाफेडची खरेदी सुरू झाली नाही. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.
घाम गाळून पिकवलेल्या कांद्याला ₹२-३ इतका मातीमोल भाव मिळाल्याने,निराश झालेला शेतकरी अश्रू गाळत कांद्याची होळी करतोय.त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचं दुःख मी जाणून घेतलंय.शेतकऱ्यांच्या घामाची-अश्रूंची जाणीव ठेवून,सरकारने तातडीने अनुदान जाहीर करावं.#सरकार_दौऱ्यावर_राज्य_वाऱ्यावर pic.twitter.com/ikwv0ChLFK
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 6, 2023
काय म्हणाले आहे ट्विटमध्ये ?
रोहित पवार यांनी ट्विट करून म्हटले आहे की, “घाम गाळून पिकवलेल्या कांद्याला ₹२-३ इतका मातीमोल भाव मिळाल्याने,निराश झालेला शेतकरी अश्रू गाळत कांद्याची होळी करतोय.त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचं दुःख मी जाणून घेतलंय. शेतकऱ्यांच्या घामाची-अश्रूंची जाणीव ठेवून,सरकारने तातडीने अनुदान जाहीर करावं.”
नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक
दरम्यान नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले असून कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने कांद्याची होळी पेटवलेली आहे. या शेतकऱ्याने पंधरा दिवसांपूर्वी कांदा अग्निडाग समारंभ आयोजित केल्याची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या समारंभास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील निमंत्रण देण्यात आले होते.
आज होळीच्या दिवशी सरकारच्या धोरणाला वैतागून या शेतकऱ्याने तब्बल दीड एकरावरील कांद्याला अग्निडाग दिला आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. शेतकऱ्यांचे जगणे सरकारला मान्य नाही. उत्पादकांनी कष्टाने पिकवलेला कांदा जाळून टाकला आहे. आजचा दिवस काळा दिवस आहे. शेतकरी जगला काय आणि मेला काय सरकारला देणे- घेणे नसल्याचे सांगत शेतकऱ्याने व्यथा मांडली.