Download App

पुढच्या 24 तासासाठी IMD कडून ऑरेंज अलर्ट, ‘या’ जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा

  • Written By: Last Updated:

Rain Updates : महाराष्ट्रात यंदा मान्सून (Monsoon) उशीराने दाखल झाला. मान्सूनच्या आगमनाची घोषणा 25 जून रोजी झाली होती. त्यानंतर दोन दिवसांनी पुणे, मुंबई अन् राज्यातील बहुतांश भागात पाऊस सुरू झाला. या पावसाच्या आगमनाने नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे, तर बळीराजा सुखावला असून अनेक भागांत पेरणीची लगबग सुरू झाली. आता तर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. दरम्यान, अशातच येत्या 24 तासात राज्यात पावसाचा जोर आणखीच वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) वर्तवला. (Orange alert from IMD for next 24 hours, warning of rain in most parts of the state)

मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागात पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी भूस्खलनही झाले. अशातच आता हवामान खात्याने उद्या म्हणजेच 29 जून महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी असेल, या संदर्भात अंदाज वर्तवला आहे. आयएमडीने उद्या ऑरेंज अलर्ट जारी केलाय, त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे.

राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार, शिंदे सरकारचा निर्णय 

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, गुरूवारी रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक, पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, त्यामुळे उद्या या भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे कोल्हापूर, सिंधुदुर्ग, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबईसह उपनगरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे परिसरात पाणी साचलं. तर ठाण्यातही मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. या पावसाचा फटका मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेलाही बसला आहे. मुसळधार पावसाने लोकल रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळं कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहेत. आता पुढील २४तासात पावसाचा जोर आणखीच वाढणार असून काम असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं.

Tags

follow us