Outline of state budget session announced : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, 23 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार असून ते बुधवार, 25 मार्च 2026 पर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प 6 मार्च रोजी सादर केला जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच अर्थसंकल्प मांडणार आहेत.
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत अधिवेशनाच्या कामकाजाची सविस्तर रूपरेषा निश्चित करण्यात आली. ठरलेल्या कार्यक्रमानुसार, 23 फेब्रुवारी ते 25 मार्च या कालावधीत मुंबई येथे अधिवेशन होणार असून 6 मार्च रोजी राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प मांडण्यात येईल.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहांत दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोक प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. अधिवेशन काळातील सुट्ट्यांचाही विचार करून कामकाजाचे नियोजन करण्यात आले आहे. शनिवार, 28 फेब्रुवारी रोजी शासकीय सुट्टी असली तरी त्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज होणार आहे. मात्र, सोमवार 2 मार्च (होळी) आणि 3 मार्च (धूलिवंदन) या दिवशी कामकाज राहणार नाही. तसेच 19 मार्च रोजी गुढीपाडव्याची सार्वजनिक सुट्टी असल्याने त्या दिवशीही अधिवेशन होणार नाही.
टी-20 वर्ल्ड कप 2026 – दुसऱ्या सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का, अभिषेक शर्मा रुग्णालयात दाखल
20 मार्च रोजी देखील कामकाज स्थगित ठेवण्यात येणार आहे. या अधिवेशनात अनेक महत्त्वाचे विषय चर्चेसाठी घेतले जाणार आहेत. संयुक्त राष्ट्र संघाने सन 2026 हे ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर या विषयावर विशेष चर्चा होणार आहे. 9 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त दोन्ही सभागृहांत विशेष चर्चेचे आयोजन करण्यात येणार आहे.
तसेच मराठी भाषा गौरव दिनानिमित्तही सभागृहात चर्चा होणार असून, निवृत्त होणाऱ्या सदस्यांचा निरोप समारंभही आयोजित केला जाणार आहे. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री छगन भुजबळ तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
