शेतकऱ्यांच्या संवाद मेळाव्यात आमदार सुरेश धस यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचा जाणता राजा म्हणून उल्लेख
फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करत सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘शेतकऱ्यांचा खरा जाणता राजा’ असे संबोधले.
MLA Suresh Dhas refers to Fadnavis as a Janta Raja : बीड जिल्ह्यातील आष्टी येथे आयोजित फळबाग शेतकऱ्यांच्या संवाद मेळाव्यात आमदार सुरेश धस यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांवर जोरदार टीका केली. राज्य सरकारने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या उपाययोजनांचा उल्लेख करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थन केले. त्याचवेळी दुष्काळग्रस्त भागात विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून सुरू असलेल्या दौऱ्यांवर निशाणा साधत धस यांनी त्यांचा उल्लेख ‘ठाकरेंची जत्रा’ असा केला.
सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. जिल्ह्यातील गेल्या 40 ते 50 वर्षांपासूनची कथित दादागिरी मोडून काढण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असल्याचा दावा त्यांनी केला. फडणवीस यांच्यावर यापूर्वी करण्यात आलेल्या टीकेचा संदर्भ देत धस यांनी आपल्या राजकीय विरोधकांवर निशाणा साधला. त्याचबरोबर अतिवृष्टी किंवा दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या फळबागधारक शेतकऱ्यांना हेक्टरी 6 लाख 55 हजार रुपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी व्यासपीठावरून केली.
विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून सुरू असलेल्या शेतकरी आणि दुष्काळग्रस्त भागांच्या दौऱ्यांवर धस यांनी प्रश्न उपस्थित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर, धाराशिव आणि लातूर या भागांचा दौरा केल्याचा उल्लेख करत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री स्वतः मदतीबाबत आश्वासन देत असताना विरोधकांनी पुन्हा दौरे करण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी केला. याचवेळी विरोधकांच्या दौऱ्यांचा उल्लेख त्यांनी ‘ठाकरेंची जत्रा’ असा केला.
बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! 28 ते 30 सप्टेंबरचा तीन दिवसांचा देशव्यापी बँक संप स्थगित
शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करत सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘शेतकऱ्यांचा खरा जाणता राजा’ असे संबोधले. त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसह विविध निर्णय घेण्यात आल्याचा दावा धस यांनी केला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी सांगितले.
दुष्काळ जाहीर झालेल्या भागांतील शेतकऱ्यांसाठी जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती यासारख्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. कृषिपंपांच्या चालू वीजबिलातही सवलत दिली जाणार असून शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी देण्याची तरतूद आहे. रोजगार हमी योजनेच्या नियमांमध्ये शिथिलता आणून अधिकाधिक कामे सुरू करण्यावरही भर दिला जाणार आहे.
कोपर्डी प्रकरणात मोठी घडामोड; मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती घटनास्थळाची करणार प्रत्यक्ष पाहणी
पाणीटंचाई असलेल्या भागांत आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. टंचाई जाहीर झालेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची वीजजोडणी खंडित केली जाणार नाही. शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी आणि शेतमजुरांना अन्नधान्य उपलब्ध करून देणे, जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करणे आणि जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्याचाही समावेश आहे.
याशिवाय पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पिकांच्या नुकसानीची छायाचित्रे आणि जीपीएस माहिती संकलित करण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत किती आणि कधी मिळते, तसेच फळबागधारकांसाठी धस यांनी केलेल्या हेक्टरी 6 लाख 55 हजार रुपयांच्या मदतीच्या मागणीवर सरकार काय निर्णय घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.