Download App

ओबीसींच्या एल्गार सभेकडे पाठ! पक्षश्रेष्ठींकडे बोट दाखवत पंकजा मुंडेंनी सांगितलं ‘इंटर्नल पॉलिटिक्स’

बीड : प्रत्येक पक्षानं कोणत्या नेत्यांना पाठवायचे याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आमच्या पक्षाकडून आशिष देशमुख, देवयानी फरांदे व डॉ. विकास महात्मे यांना पाठवले होते. ते त्या कार्यक्रमाला गेल्यामुळे मी तिथे गेले नाही, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी जालना जिल्ह्यातील अंबडमधील ओबीसी एल्गार सभेला अनुपस्थित राहण्याचे कारण स्पष्ट केले. पंकजा मुंडे यांचे बॅनर्स लागूनही त्या अनुपस्थित असल्याने तर्कवितर्कांना उधाण आले होते. त्यानंतर त्यांनी रात्री व्हिडीओच्या माध्यमातून खुलासा केला. (Pankaja Munde explained the reason for her absence from the OBC Elgar Sabha in Ambad, Jalna district.)

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला विरोध करत जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये काल (17 नोव्हेंबर) ओबीसी आरक्षण एल्गार सभा (OBC Reservation) पार पडली. या सभेसाठी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय ओबीसी नेते एकवटले होते. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, आमदार राजेश राठोड, माजी आमदार आशिष देशमुख, महादेव जानकर, माजी आमदार नारायण मुंढे, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे असे सर्वच दिग्गज जालन्यात जमले होते.

भुजबळांना सरकारचा पाठिंबा आहे का? नसल्यास तात्काळ हकालपट्टी करा! संभाजीराजे छत्रपती संतापले

यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात ओबीसी समाजाचे मोठे आंदोलन उभे राहण्याची चिन्ह आहेत. याशिवाय ऐन निवडणुकांपूर्वीही शिंदे सरकारला अप्रत्यक्ष इशारा असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या सर्व नेत्यांमध्ये पंकजा मुंडे न दिसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. ऐन निवडणुकांच्या तोंडावर राज्यात ओबीसी समाजाच्या राजकारणाच्या दृष्टीने जालना येथील एल्गार सभा महत्वाची मानली जात होती. पण त्यानंतही पंकजा यांनी टाळल्याने अनेक सवाल विचारले जात होते, त्यावर आता खुद्द पंकजा मुंडे यांनीच खुलासा केला आहे.

मराठा व्होट बँक, भुजबळांचं एकमुखी नेतृत्व अन् फडणवीसांसोबतचा वाद : पंकजांची जालन्याकडे पाठ!

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

“मी ओबीसी आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय कार्यक्रमाला उपस्थित राहणे अपेक्षित होते. माझे फोटोही बॅनर्सवर होते. त्यामुळे मी तिथे उपस्थित राहणार आहे असे लोकांना वाटत होते. पण प्रत्येक पक्षानं कोणत्या नेत्यांना पाठवायचे याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आमच्या पक्षाकडून आशिष देशमुख, देवयानी फरांदे व डॉ. विकास महात्मे यांना पाठवले होते. ते त्या कार्यक्रमाला गेल्यामुळे मी तिथे गेले नाही, असा खुलासा पंकजा मुंडे यांनी केला. यावेळी पंकजा मुंडे यांनी भुजबळ यांच्या भाषणालाही दाद दिली. “ती खेळपट्टी छगन भुजबळांची होती. त्यांनी बॅटिंग करावी असे वाटले, तशी त्यांनी ती केली”, असे म्हणत त्यांच्या भाषणाचे कौतुक केले.

Tags

follow us