मराठा व्होट बँक, भुजबळांचं एकमुखी नेतृत्व अन् फडणवीसांसोबतचा वाद : पंकजांची जालन्याकडे पाठ!

मराठा व्होट बँक, भुजबळांचं एकमुखी नेतृत्व अन् फडणवीसांसोबतचा वाद : पंकजांची जालन्याकडे पाठ!

जालना : तब्बल 30 वर्षांनंतर जालना जिल्हा पुन्हा एकदा ओबीसी आरक्षण आंदोलनाचे केंद्रबिंदू बनला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला विरोध करत आज जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये ओबीसी आरक्षण एल्गार (OBC Reservation) सभा पार पडली. या सभेसाठी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय ओबीसी नेते एकवटले होते. (Why was Pankaja Munde absent from OBC Reservation meeting in Jalna)

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, आमदार राजेश राठोड, माजी आमदार आशिष देशमुख, महादेव जानकर, माजी आमदार नारायण मुंढे, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे असे सर्वच दिग्गज जालन्यात जमले होते. यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात ओबीसी समाजाचे मोठे आंदोलन उभे राहण्याची चिन्ह आहेत. याशिवाय ऐन निवडणुकांपूर्वीही शिंदे सरकारला अप्रत्यक्ष इशारा असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, या सर्व नेत्यांमध्ये पंकजा मुंडे न दिसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गोपीनाथ मुंडे हे छगन भुजबळ यांच्यासोबत ओबीसी समाजाचे नेते म्हणून लढत असायचे. मुंडे यांनीच वसंतराव भागवत यांनी आणलेला माधव, अर्थात माळी, धनगर, वंजारी फॉर्म्युला पुढे नेत विशिष्ट जातीपुरत्या मर्यादित असलेल्या भाजपसोबत ओबीसी समाजाला जोडलं. मुंडे यांच्यानंतर त्यांचे राजकीय नेतृत्व पंकजा मुंडे यांच्याकडे आले. त्यांच्या ओबीसी समजाच्या नेत्या म्हणून पाहिले जाऊ लागले. त्यांनी मागील आठ ते दहा वर्षांच्या काळात ओबीसी समाजासाठी सत्तेत असताना आणि नसतानाही ओबीसी समाजाचे प्रश्न मांडत होत्या.

जालन्यात OBC एल्गार! भुजबळ, वडेट्टीवर, पडळकर, देशमुख अन् जानकर एकाच मंचावर

आता मागील काही दिवसांपासून जरांगे पाटील यांनी उपोषणाची सुरुवात करत सरसकट कुणबी प्रमाणपत्रांची मागणी करत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत आहेत. यालाच विरोध करत राज्यातील ओबीसी नेते एकवटले आहेत. ऐन निवडणुकांच्या तोंडावर राज्यात ओबीसी समाजाच्या राजकारणाच्या दृष्टीने जालना येथील एल्गार सभा महत्वाची मानली जात आहे. पण त्यानंतही पंकजा यांनी टाळल्याने अनेक सवाल विचारले जात आहेत. त्या नेमक्या का अनुपस्थित होत्या याबाबत त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र त्यांची अनुपस्थिती असण्यामागे तीन प्रमुख कारणे सांगितली जात आहे.

1) आगामी निवडणुका अन् मराठा व्होट बँक :

पंकजा मुंडे यांच्या अनुपस्थितीमागे पहिले कारण आहे ते म्हणजे आगामी निवडणुका आणि त्यातील मराठा व्होट बँक. लोकसभा निवडणुकांना आता सहा महिन्यांपेक्षाही कमी कालावधी बाकी आहे. तर विधानसभा निवडणुकांसाठी 10 महिन्यांपेक्षा कमी कालावधी उरला आहे. अशा परिस्थिती ऐन निवडणुकांच्या तोंडावरच राज्यात सुरु असलेल्या मराठा विरुद्ध ओबीसी वादापासून त्या स्वतःला लांब ठेवू इच्छित असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. केवळ ओबीसीच्या मंचावर जाऊन बहुसंख्य मराठा समाजाला दुखविण्याची त्यांची मनस्थिती नसल्याचे सांगितले जाते.

‘लेकरांचं नाव घेऊन लहान भावाच्या ताटातलं काढाल तर..’; वडेट्टीवारांचा जरांगेंना थेट इशारा

2) छगन भुजबळांनी ओबीसींचे नेतृत्व आपल्याकडे खेचले :

वरती सांगितल्याप्रमाणे पंकजा मुंडे यांनी वडिलांचा वारसा पुढे घेऊन जात ओबीसीचे प्रश्न मांडण्यास सुरुवात केली. मात्र आताच्या परिस्थितीमध्ये भुजबळ ओबीसी आरक्षण लढ्याचे एकमुखी नेतृत्व करताना दिसत आहेत. त्यामुळे जरी आरक्षणाचा प्रश्न आता सुटला तरी त्याचे क्रेडिट मात्र भुजबळ यांना जाऊ शकते. अशा स्थितीमध्ये भुजबळ यांचे नेतृत्व स्वीकारुन आपले नेतृत्व झाकोळले जाऊ शकते. त्यामुळे एकट्यानेच ओबीसी समाजासाठी लढण्याची त्यांची रणनीती असू शकते असे बोलले जाते.

3. फडणवीसांशी असलेले वादाचे संबंध :

आजच्या व्यासपीठावर बघितल्यास गोपीचंद पडळकर, आशिष देशमुख, प्रकाश शेंडगे हे नेते दिसत आहेत. हे सर्व नेते फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्याचवेळी भुजबळ यांनाही फडणवीस यांचा अंतर्गत पाठिंबा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. फडणवीस आणि मुंडे यांचे फारसे सख्य नाही, हे उभा महाराष्ट्र जाणतो. त्यामुळेच या नेत्यांच्या फळीत जाण्याचे पंकजा यांनी टाळले असावे असे सांगितले जाते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube