शेतकऱ्यांची थट्टा, सरसकट हेक्टरी 50 हजार मदत करा, विजय वडेट्टीवार भडकले
Vijay Wadettiwar : महायुती सरकार हे शेतकऱ्यांची थट्टा करत आहेत. मराठवाड्यात जानेवारी ते सप्टेंबर मध्ये 781 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

Vijay Wadettiwar : महायुती सरकार हे शेतकऱ्यांची थट्टा करत आहेत. मराठवाड्यात जानेवारी ते सप्टेंबर मध्ये 781 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अतिवृष्टीमध्ये गेल्या 15 दिवसात 74 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असताना आज फक्त सरकारने मदतीचे आकडे फुगवून सांगत ही तर सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केल्याची टीका काँग्रेस विजय वडेट्टीवार यांनी केली.
राज्यात शेतकऱ्यांची जमीन खरवडून निघाली आहे. त्यांची जनावर वाहून गेली आहेत अशा वेळी शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार रुपये हेक्टरी मदत करण्याची अपेक्षा होती. अस असताना NDRF निकषानुसार दिलेली मदत ही तुटपुंजी आहे. याने शेतकरी उभा राहणार नाही तर उद्धवस्त होईल अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
पंजाबसारखे राज्य केंद्राची मदत न घेता प्रति हेक्टरी 50 हजार पर्यंत मदत देऊ शकते मग महाराष्ट्रासारख्या समृद्ध राज्यात शेतकऱ्यांना ठोस मदत का दिली जात नाही? सरकारने जाहीर केलेली मदत दिवाळीच्या आधी मिळणार आहे का? शेतकऱ्यांबरोबर शेतमजूर देखील अडचणीत आला आहे, त्यांना काय मदत मिळणार, असा प्रश्न वडेट्टीवर (Vijay Wadettiwar) यांनी उपस्थित केला.
राज्यातील विधानसभा निवडणुकीआधी महायुतीने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती.आज शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा असताना त्याची घोषणा केली नाही. कर्जमाफी करणार करणार फक्त तारीख पे तारीख सरकार सांगत आहे पण नेमकी शेतकरी कर्जमाफी कधी देणार हे सरकार सांगत नाही अशी टीका विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील हे काहीही कारण नसताना लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करत आहेत. सर्व समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळावे म्हणून जातीनिहाय जनगणना करावी, तसेच आरक्षणाची 50 टक्क्याची मर्यादा हटवावी ही भूमिका देशात सर्वात आधी राहुल गांधी यांनी मांडली आहे. असं असताना जरांगे पाटील त्यांना का टार्गेट करत आहे? जरांगे पाटील यांची लढाई सामान्य जनतेसाठी आहे की विरोधकांच्या विरोधात आहे? गेल्या काही दिवसातील जरांगे पाटील यांच्या विधानामुळे त्यांचा बोलवता धनी कोण आहे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे अशी टीका वडेट्टीवार यांनी नागपूर इथे माध्यमांशी बोलताना केली.