राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार (Pawar) यांच्या सलग बैठकांमुळं पक्षांतर्गत राजकारणाला वेग आला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सिल्व्हर ओक येथे सुमारे तीन तास भेट घेतली होती. या भेटीत राज्यातील तसंच केंद्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, बैठकीतील नेमकी चर्चा समोर आलेली नाही.
शरद पवारांच्या भेटीनंतर पार्थ पवारांनी पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद वाढवला आहे. शुक्रवारी रात्री वरळीतील त्यांच्या निवासस्थानी काही मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला नरहरी झिरवळ, बाबासाहेब पाटील, छगन भुजबळ आणि इंद्रनील नाईक उपस्थित होते. राज्यातील राजकीय परिस्थिती, विकासकामं, मंत्र्यांच्या खात्यांसमोरील अडचणी तसंच केंद्रातील मंत्रीपदाशी संबंधित विषयांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शरद पवारांची पार्थ-जय पवारांसोबत बैठक; महत्वाची पदं आणि विलीनीकरणाबाबत अंतिम निर्णय?
या बैठकीनंतर शनिवारी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार्थ पवार यांच्या वरळीतील शुभदा निवासस्थानी झाली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, नवाब मलिक, नरहरी झिरवळ, बाबासाहेब पाटील, छगन भुजबळ आणि इंद्रनील नाईक यांच्यासह प्रमुख नेते बैठकीला उपस्थित आहेत. सलग दोन दिवस वरिष्ठ नेत्यांच्या बैठका होत असल्याने पक्षाच्या पुढील राजकीय रणनीतीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, पुण्यातील निधीवाटपाच्या मुद्द्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या तणावाचीही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांचा निधी रोखण्यात आल्याचा मुद्दा पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी उपस्थित केला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडंही तक्रार करण्यात आल्याचं सांगितले जात आहे.
पार्थ पवारांनीही पुण्यातील या घडामोडींची पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आहे. त्यानंतर भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पार्थ पवार यांच्याशी फोनवर चर्चा केल्याची माहिती आहे. निधीवाटपाच्या वादावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये सोमवारी बैठक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळं पुण्यातील राजकीय तणाव कमी करण्याच्या दृष्टीने या चर्चेला महत्त्व प्राप्त झालं आहे.
शरद पवारांची भेट आणि त्यानंतर पार्थ पवारांकडून सुरू झालेल्या बैठकांच्या मालिकेमुळं राष्ट्रवादीच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. पक्षातील अंतर्गत प्रश्न, राज्यातील सत्ताधारी आघाडीतील समन्वय आणि पुण्यातील निधीवाटपाचा वाद या पार्श्वभूमीवर या बैठकांकडे पाहिले जात आहे. मात्र, बैठकीत नेमका कोणता निर्णय किंवा रणनीती ठरली, याबाबत पक्षाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
