गद्दारांना युक्तिवाद नसतो; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.
Sanjay Raut’s major statement : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. ठाकरे गटाच्या वतीने वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून आता शिंदे गटाच्या बाजूने युक्तिवाद सुरू होणार आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात आमचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. गद्दारांना युक्तिवाद नसतो. तो एक फुटीर गट आहे. ते त्यांचे म्हणणे मांडतील. त्यांनी कुठे काय केले, कोणाच्या मदतीने केले, सुरत आणि गुवाहाटीमध्ये काय घडले, हे सर्व आता ते न्यायालयासमोर मांडतील.
राऊत यांनी पुढे सांगितले की, शिंदे गटाची भूमिका देशासमोर आणि न्यायालयासमोर स्पष्ट होणे आवश्यक आहे. ते नेमके काय सांगतात, त्यांचा दावा काय आहे, हे सर्वांनी ऐकले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाच्या बाजूने कपिल सिब्बल यांनी सविस्तर युक्तिवाद केला असून आता शिंदे गटाच्या वतीने बाजू मांडली जाणार आहे. या सुनावणीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
जुन्या वादातून धीरज परदेशीचा काटा काढला; मुख्य आरोपीने उलगडला हत्येचा कट
याचवेळी ठाकरे गटाला आणखी एका मुद्द्यावर धक्का बसला आहे. माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी जात प्रमाणपत्र पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले आहे. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद धोक्यात आले असून ते रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी त्यांच्याकडे तीन महिन्यांची मुदत उपलब्ध आहे.
विशाखा राऊत या मुंबई महापालिकेच्या 191 क्रमांकाच्या प्रभागातून निवडून आल्या असून त्यांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या कन्या प्रिया सरवणकर यांचा पराभव केला होता. या प्रकरणावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना भाजप आणि सत्ताधारी पक्षांवर गंभीर आरोप केले. हे सर्व जाणीवपूर्वक केले जात आहे. आमची संख्या कमी करण्यासाठी षडयंत्र रचले जात आहे. भाजपच्या अनेक नगरसेवकांच्या जात प्रमाणपत्रांबाबत आक्षेप असूनही त्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. मात्र, आमच्या नगरसेवकांवर तातडीने निर्णय घेतले जात आहेत, असा आरोप त्यांनी केला.
त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आणि विशाखा राऊत यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणामुळे राज्यातील शिवसेना विरुद्ध शिवसेना संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.