Rahul Kalate On Pimpri Chinchwad Waste Management: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन नवीन क्षेत्रीय कार्यालये सुरू केली असली, तरी या कार्यालयांना आवश्यक मनुष्यबळ, वाहने आणि इतर संसाधने उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत. परिणामी, आमच्या रायगड (ज) क्षेत्रीय कार्यालय परिसरात कचरा संकलन आणि स्वच्छता व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याचे मांडत यावर तत्काळ कार्यवाही करण्याचे निवेदन भाजपा नगरसेवक राहुल तानाजी कलाटे यांनी महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्याकडे दिले आहे.
शिंदेंची झोळी वर्षभरात ठाकरे बंधूंपेक्षा जास्त भरली; आयोगाने सांगून टाकले आकडे
मोशी येथील कचरा डेपोतील दुर्घटनेला जवळपास तीन महिने उलटूनही रायगड (ज) क्षेत्रीय कार्यालय परिसरातील कचरा संकलन कामकाज पूर्णपणे सुरळीत झालेले नसल्याचे राहुल कलाटे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. कचरा खाली करण्यासाठी वाहनांना चार ते पाच तास लागतात. तर अपुऱ्या वाहन संख्येमुळे कचरा संकलनाच्या फेऱ्या कमी होत आहेत. तसेच, संबंधित ठेकेदारांकडून आवश्यक वाहने वेळेत उपलब्ध होत नसल्याने कचरा संकलन आणि स्वच्छता व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याचे कलाटे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
कलाटे यांच्या मांडणीनुसार रायगड क्षेत्रीय कार्यालय परिसरात प्रभाग क्रमांक १६, २५ आणि २६ यांचा समावेश असून, तीन लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या या क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत वाकड, ताथवडे, पुनावळे, पिंपळे निलख, रावेत, किवळे आणि मामुर्डी या झपाट्याने विकसित होणाऱ्या परिसराचा समावेश आहे. मात्र, या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत कचरा संकलनासाठी आवश्यक वाहनांची संख्या, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ आणि इतर सुविधा अपुऱ्या पडत असल्याने अनेक सोसायट्यांमधून नियमित कचरा संकलन होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. परिणामी, परिसरात कचरा साचणे आणि दुर्गंधी पसरणे यांसारख्या समस्या निर्माण होत आहेत. यातून ‘स्वच्छ भारत‘ या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.
नवीन कार्यालये सुरू करून उपयोग काय, जर त्यांना आवश्यक साधनेच उपलब्ध नसतील? असा सवाल उपस्थित करत राहुल कलाटे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. क्षेत्रीय कार्यालयांची निर्मिती ही केवळ प्रशासकीय रचना न राहता नागरिकांना वेळेत आणि प्रभावी सेवा देणारी यंत्रणा बनली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
वाढत्या लोकसंख्येचा आणि नागरीकरणाचा विचार करून संबंधित क्षेत्रीय कार्यालयांना आवश्यक प्रमाणात घंटागाड्या, कचरा संकलनासाठी वाहने, स्वच्छता कर्मचारी आणि इतर यंत्रसामग्री तातडीने उपलब्ध करून द्यावी. तसेच, कचरा संकलन करणाऱ्या वाहनांच्या फेऱ्या वाढवाव्यात, संबंधित ठेकेदारांच्या कामकाजावर नियमित देखरेख ठेवावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
याशिवाय, कचरा संकलनासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदारांच्या कामकाजाची नियमित तपासणी करावी, मेकॅनिकल स्वीपिंग यंत्रणेद्वारे स्वच्छता प्रभावीपणे राबवावी आणि कामात निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. यासोबतच, गटारांची स्वच्छता करण्यासाठी आवश्यक असलेल्या जेटिंग मशीनसह इतर यंत्रसामग्रीचीही मोठी कमतरता असल्याचे राहुल कलाटे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
ब्रेकिंग! जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील…
या भागात नागरीकरण वाढत असताना सांडपाणी प्रक्रिया करणारे (STP) प्रकल्प अपुरे आहेत. परिणामी, मैलामिश्रित सांडपाण्याची योग्य प्रक्रिया न होता ते नाले आणि नैसर्गिक जलप्रवाहांमध्ये सोडले जाण्याची गंभीर समस्या निर्माण होत आहे. यामुळे परिसरातील पर्यावरण, जलस्रोत आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे पुरेशा क्षमतेचे STP प्रकल्प उभारावेत, अस्तित्वातील प्रकल्पांची क्षमता वाढवावी आणि सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते सोडले जाणार नाही, याची प्रशासनाने कठोर दक्षता घ्यावी, अशी मागणी नगरसेवक राहुल कलाटे यांनी केली आहे.
