Download App

बीडमध्ये ‘अजब प्रेमाची, गजब कहाणी’; आधी अत्याचाराचे आरोप, नंतर त्याच API सोबत कारमध्ये गुलूगुलू

पीडिताही तोंड बांधून तेव्हा कारमध्येच बसलेली होती. तसेच शिंदेच्याही तोंडाला फटका होता. त्यानंतर पीडितेच्या पतीने शिंदेविरोधात तक्रार दिली.

  • Written By: Last Updated:

बीडमध्ये सध्या एका विवाहबाह्य प्रेम प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे. (Beed) सोशल मिडियावर याचे व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत. त्याचं झालं असं की, बीड येथील पोलीस विभागात साहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झालेल्या रवींद्र शिंदे याचा एका विवाहित महिलेवर जीव जडला. विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. ती महिला पोलीस अधिकाऱ्याच्या घराशेजारीच राहत होती.

रवींद्र शिंदे याने बीडमध्ये असताना एका विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर या पोलीस अधिकाऱ्याची धाराशिवला बदली झाली. तिथे जाऊन देखील पिस्तूलचा धाक दाखवून त्याने या महिलेवर अत्याचार केला. त्यानंतर याच पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दखल करण्यात आला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्याच पीडित महिलेवर पुन्हा शिंदेचा जीव जडला. दरम्यान, ती पीडित महिला आणि तो पोलीस अधिकारी शिंदे हे बीडमध्ये एकदा भेटले. दोघेजण कारमधून फिरताना त्या पीडित महिलेच्या पतीने त्या दोघांना रंगेहाथ पकडलं.

कुंपणानेच शेत खाल्लं! जामीन मंजूर करण्यासाठी मागितली ५ लाखांची लाच, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

त्यानंतर भर रस्त्यावर प्रियकर असलेल्या साहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे याला कपडे फाटेपर्यंत पीडित महिलेच्या पतीनं बदडलं. यावेळी या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. ‘अजब प्रेमाच्या या गजब कहाणी’ची जोरदार चर्चा सुरू आहे. हा प्रकार काल दुपारी बीड शहरातील बसस्थानकासमोर घडला असल्याचं सांगण्यात येत आहे. पीडिता आणि पोलीस अधिकारी रवींद्र शिंदे हे कारमधून बीड शहरातील भाग्य नगर भागात होते. पीडितेच्या पतीने त्यांना पाहताच त्यांचा पाठलाग केला. तुळजाई चौक, नगर नाका, बसस्थानकमार्गे बाहेर जाण्यापूर्वीच पतीने त्याच्या कारसमोर दुचाकी आडवी लावून शिंदेला खाली खेचलं. त्याला कपडे फाटेपर्यंत बदडलं.

पीडिताही तोंड बांधून तेव्हा कारमध्येच बसलेली होती. तसेच शिंदेच्याही तोंडाला फटका होता. त्यानंतर पीडितेच्या पतीने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठत शिंदेविरोधात तक्रार दिली. पोलीस अधिकारी शिंदे हा पोलिसांसमोरून पळाला असल्याचं पीडितेच्या पतीनं सांगितलं. तर, पोलीस अधिकारी शिंदे हा अत्याचाराच्या गुन्ह्यात फरार आहे, असं असतानाही तो बीडमध्ये येऊन पीडितेला घेवून फिरत होता. काल दुपारी पोलिसांनी हा वाद मिटवला असल्याचंही समोर येत असून त्या पीडितेसह पतीला पकडलं. परंतु आरोपी असलेल्या शिंदेला अभय दिलं आणि त्यामुळे त्याने तिथून धूम ठोकली.

शिंदे हा आरोपी आहे, हे माहीतच नाही, असा खुलासा यावेळी बीड येथील शिवाजीनगर पोलिसांनी केला. पीडित महिला ही मागच्या तीन दिवसांपासून घरी आली नव्हती. त्यामुळे पीडितेच्या पतीला संशय आला आणि काल दुपारी तो खरा ठरला. त्याने पीडिता आणि पोलीस अधिकारी शिंदे यांना कारमध्ये रंगेहाथ पकडलं. त्यानंतर दोघेही शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेले. पीडितेने शिंदेविरोधात तक्रार देण्याऐवजी पतीवरच आरोप केले. परंतु पोलिसांना सर्व माहिती असल्यानं त्यांनी तिला शांत केलं. त्यानंतर तिच्या पतीच्या तक्रारीवरून गुन्हेगारी शिंदेविरोधात गुन्हा दाखल केला.

Tags

follow us