नाशिक : गिरणा नदीपात्रात फेकलेले ड्रग्ज शोधण्याच्या नादात पोलिसांनी तब्बल 20 कोटी लिटर पाणी वाया घालवल्याचा प्रकार समोर आला आहे. आधीच दुष्काळाचे सावट असताना पोलिसांच्या या कृतीमुळे आता राज्यभरातून संताप व्यक्त होतं आहे. विशेष म्हणजे एवढे पाणी वाया घालविल्यानंतरही पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. यानंतर गिरणा नदीपात्रात आता केवळ मृतसाठा शिल्लक राहिला आहे. (Police wasted 20 crore liters of water in search of drugs thrown in Girna river)
ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणाने (Lalit Patil) राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. ससून रुग्णालायातून पसार झाल्यानंतर त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी जंग-जंग पछाडले होते. त्याचवेळी मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला चेन्नईतून अटक केली. त्याच्या काही साथीदारांनाही ताब्यात घेतले. या सगळ्यांच्या चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील ग्रामीण भागात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली. देवळा तालुक्यातील ठेंगोडा गावाजवळील गिरणा नदीपात्रात ड्रग्जचा मोठा साठा पोलिसांच्या हाती लागला.
मुंबई पोलिसांच्या टीमला रात्री दोन वाजता नदीत अंडरवॉटर कॅमेऱ्याच्या मदतीने ड्रग्जच्या गोण्या सापडल्या होत्या. दोन गोण्यातून तब्बल 50 किलो ड्रग्ज नदीत जप्त केले होते. या ड्रग्जची किंमत अंदाजे शंभर कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा शोधमोहिम राबविण्यात आली. मात्र पाणी पातळी जास्त असल्याने शोधमोहिमेत अडचणी येत होत्या. ही थांबवलेली शोधमोहिम ललित पाटीलचा चालक सचिन वाघला सोबत घेऊन रविवारी पुन्हा सुरु करण्यात आली.
मात्र, पाणी पातळी कमी करण्यासाठी ठेंगोडा साठवण बंधाऱ्याजवळील ठेंगोडा, लोहोणेर आणि देवळा तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेसाठी संरक्षित असलेले तब्बल 200 क्यूसेक पाणी सोडण्यात आले. पहाटे सहा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत पाणी सोडत पात्र रिकामे करण्यात आले. पण या दरम्यान, पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती मिळताच असंख्य शेतकऱ्यांनी पाणी सोडण्यास विरोध करत पाटबंधारे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पण अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा विरोध न जुमानता पाणी सोडणे सुरुच ठेवले.
यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी बंधाऱ्यावर जाऊन विरोध सुरु केला. अखेर शेतकऱ्यांच्या विरोधानंतर पाणी थांबवण्यात आले. मात्र तोपर्यंत 20 कोटी लिटर पाणी वाया गेल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता गिरणा नदीपात्रात केवळ मृतसाठा शिल्लक राहिला आहे. आधीच दुष्काळाचे सावट असताना पोलिसांच्या या कृतीमुळे आता राज्यभरातून संताप व्यक्त होतं आहे. विशेष म्हणजे एवढे पाणी वाया घालविल्यानंतरही पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही.