पुणे : परिविक्षाधिन आयएएस (IAS) अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या राजेशाही थाटाची मागणी संपूर्ण महाराष्ट्रात गाजली. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेही (Suhas Divase) या थाटाला वैतागले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या बाजूच्याच केबिनची मागणी करणे, वरिष्ठांचे अँटी चेंबर बळकावणे, घराच्या मागणीवर अडून बसणे, शिपाई आणि अन्य मदतनीसांची मागणी करणे, ऑडीसारख्या अलिशान गाडीतून ऑफिसला येणे, शिवाय याच खाजगी गाडीला अंबर दिवा बसवून घेणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घालणे, अशा थाटात खेडकर यांचा पुण्यात वावर होता. (Pooja Khedkar accused of producing controversial disability certificate and fake non-criminal certificate before becoming IAS)
खेडकर यांच्या याच रुबाबाला अन् चमकोगिरीला जिल्हाधिकारी वैतागले होते. अखेर शासनाने त्यांची बदली करावी अशी मागणीच त्यांनी केली. त्यानुसार खेडकर यांची वाशिमला रवानगी झाली. आता खेडकर यांचे अन्यही काही प्रताप समोर येत आहेत. त्यांनी वादग्रस्त अपगंत्व प्रमाणपत्र देऊन IAS ची पोस्ट मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. शिवाय वडिलांची 40 कोटींची संपत्ती असूनही त्यांनी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.
पुजा खेडकर या 2023 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. यासाठी आवश्यक असणारी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षाही त्या उत्तीर्ण आहेत. मात्र ही परीक्षा त्यांनी व्हिज्युअली इम्पेअर्ड प्रवर्गातून दिली आहे. त्यांना मेंटल इलनेस आहे असे प्रमाणपत्र त्यांनी सादर केले आहे. त्यांनी हे प्रमाणपत्र सादर केल्याने कमी गुण असतानाही त्यांना IAS पदासाठी प्राधान्य मिळाले. थोडक्यात विशेष सवलत मिळवून त्या IAS बनल्या, असा त्यांच्यावर आरोप आहे.
पूजा खेडकर यांनी दिलेले प्रमाणपत्र खरे आहे का? त्यांना खरंच काही त्रास आहे का? याची तपासणी करण्याचे केंद्रीय लोकसेवा आयोगाने ठरविले. मात्र तब्बल सहावेळा पूजा खेडकर यांनी वैद्यकीय चाचणीला उपस्थित राहण्याचे टाळले. सर्वात आधी 22 एप्रिल 2022 ला दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करायचे ठरले. मात्र आपल्याला कोविड झाल्याचे कारण देत त्यांनी चाचणीला जाण्याचे टाळले. त्यानंतर 26 मे 2022 ला पुन्हा एम्स रुग्णालयात तर 27 मे 2022 ला दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये चाचणीसाठी बोलण्यात आले. पण तिथेही त्या गेल्या नाहीत.
त्यानंतर एक जुलैला खेडकर यांना चौथ्यांदा एम्समध्ये बोलवण्यात आले. पण त्या गेल्या नाहीत. अखेर 26 ऑगस्ट 2022 रोजी खेडकर या चाचणीसाठी तयार झाल्या. 2 सप्टेंबर रोजी त्यांना एम्स रुग्णालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. तिथे त्यांची न्यूरो ओपथोमोलॉजिस्ट चाचणी होणार होती. पण त्या उपस्थित राहिल्या नाहीत. 25 नोव्हेंबर 2022 ला पुन्हा पूजा खेडकर यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी पुन्हा नकार दिला. त्यानंतर अचानक एक दिवस खेडकर यांनी एका एमआरआय सेंटरमधून एक अहवाल केंद्रीय लोकसेवा आयोगाला सादर केला.
या प्रमाणपत्रावर आयोगाने हरकत घेतली आणि सेंट्रल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल अर्थात CAT मध्ये पूजा खेडकर यांच्या निवडीला आव्हान दिले. त्यानंतर 23 फेब्रुवारी 2023 रोजी कॅटने पूजा खेडकर यांच्या विरोधात निकाल दिला. पण त्यानंतर राजकीय घडामोडी घडल्या. खेडकर यांची नियुक्ती वैध ठरवली. त्यांना मसुरीला प्रशिक्षणाला पाठविण्यात आले. तिथले प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना भंडारा जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी पाठविले. पण अचानक त्यांना पुण्यात प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले, असे अनेक आरोप खेडकर यांच्या नियुक्तीवर आहेत.
Pooja Khedkar became an IAS officer from the OBC non-creamy layer category. Her father's election affidavit shows his income and wealth as Rs 40 crores. How can such income fall into the non-creamy layer? She has admitted to being mentally ill and a person with multiple… pic.twitter.com/Zrr3in0ehd
— Vijay Kumbhar (@VijayKumbhar62) July 10, 2024
इतकेच नाही तर खेडकर यांनी ओबीसी प्रवर्गातून ही परीक्षा दिली होती. यात त्यांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडणे आवश्यक होते. ते त्यांनी जोडले देखील. पण त्यांचे वडील माजी सनदी अधिकारी आहेत. त्यांना मिळणारी पेन्शन ही देखील लाखोंच्या घरात असते. त्यातच त्यांनी 2024 मध्ये अहमदनगरमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी 40 कोटींची संपत्ती जाहीर केली होती. आता वडिलांची 40 कोटींची संपत्ती असताना खेडकर यांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसे मिळाले असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळेच राजकीय हस्तक्षेपाशिवाय या सगळ्या गोष्टी शक्य आहेत का अशी शंका यायला लागली आहे.