Pune Crime Dilip Khedkar : बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईवडिलांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. आता आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी नवी मुंबईत एक अपघात झाला होता. या अपघातानंतर ट्रक हेल्परच्या अपहरणाने खळबळ उडाली होती. अपहरण झालेला युवक बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांच्या बंगल्यात आढळून आला होता. या प्रकरणात दिलीप खेडकर यांच्यावर अपहरणात सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. दिलीप खेडकर सध्या फरार आहेत.
शनिवारी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या (Pune News) सुमारास मुलुंड ते ऐरोली मार्गावर एक भीषण अपघात झाला होता. सिमेंट मिक्सर ट्रक आणि एका लँड क्रूझर गाडीचा अपघात झाला होता. यानंतर दोन लोकांनी ट्रकचा हेल्परला बळजबरीने कारमध्ये बसवून नेले होते. या घटनेची माहिती ट्रक मालक विलास ढेंगरे यांनी पोलिसांना दिली होती. यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
पूजा खेडकरचे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट रद्द! सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर परिणाम होणार?
तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी लगेचच तपास सुरू केला. पोलिसांनी लँड क्रूझर गाडीचा शोध घेतला असता ही गाडी पुण्यातील बाणेर रस्त्यावरील एका बंगल्याबाहेर उभी असल्याचे निष्पन्न झाले. हा बंगला पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांचा असल्याचे समोर आले. पोलिसांनी बंगल्याचा दरवाजा उघडण्याची विनंती केली मात्र दिलीप खेडकर यांच्या पत्नी मनोरमा खेडकर यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला. त्यांनी दरवाजा उघडण्याऐवजी थेट अंगावर कुत्रे सोडले असा दावा पोलिसांनी केला.
काही वेळाने त्या हेल्पर व्यक्तीला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. मात्र याच दरम्यान दिलीप खेडकर दुसऱ्या रस्त्याने पळून गेल्याची माहिती मिळाली. या प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेतली. मनोरमा खेडकर यांच्याविरुद्ध चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारी कामात अडथळा आणला तसेच आरोपीली पळवून लावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप खेडकर सध्या फरार असून शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी पथके रवाना केली आहेत.
पूजा खेडकरच्या आईचा नवा प्रताप; चालकाचं अपहरण करुन डांबून ठेवलं