“उद्धव ठाकरेंसोबत साखरपुडा, पण लग्नासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीरुपी भटजींचे अडथळे”
“मोदींनीही सांगितलं असेल की, वंचितवाल्यांना सोबत घेऊ नका”
“आम्ही इंडिया आघाडीत नसून शिवसेना ठाकरे गटाशी युती”
“आमच्याबद्दल त्यांच्या मनात काय अढी आहे हे शरद पवारांनाच माहिती, आम्हाला माहिती नाही”
“माझा दरवाजा सर्वांसाठी खुला…”
“महाविकास आघाडीत वंचितचा समावेश करण्याबाबत उद्धव ठाकरेंनी स्पष्टता करावी”
वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची मागील काही दिवसांमधील ही वक्तव्य पाहिल्यावर एक गोष्ट आपल्या लक्षात येते ती म्हणजे, त्यांची इंडिया आघाडीत येण्याची असलेली इच्छा. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी गतवर्षी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटासोबत युती केली. मात्र अद्याप त्यांचा इंडिया आघाडीत प्रवेश झालेला नाही. ठाकरे गट प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत आणि इंडिया आघाडीत घेण्यासाठी उत्सुक आहेत. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून मात्र फारशी अनुकूलता दाखवलेली नाही, असे चित्र दिसून आले आहे. स्वतः प्रकाश आंबेडकर यांनीही अनेकदा याच मुद्द्याकडे बोट दाखविले आहे. (Vanchit Bahujan Aghadi, Prakash Ambedkar Indian Alliance congress ncp shivsena)
मात्र आता प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः इंडिया आघाडीतील प्रवेशासाठी तयारी सुरु केल्याचे पाहायला मिळत आहे. यासाठी त्यांनी साखर पेरणीही सुरु केली आहे. तसेच शक्तीप्रदर्शन करण्याचाही त्यांचा इरादा असणार आहे. पण नेमके प्रकाश आंबेडकर त्यांचे राजकीय डावपेच कसे टाकत आहेत? याचबाबत आपण या व्हिडीओतून समजून घेणार आहोत. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने “संविधान के सन्मान में” या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या 25नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्कवर सभेच्या स्वरुपात ही रॅली होणार आहे. या सभेसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
या पत्रात आंबेडकर यांनी राहुल गांधी यांचे तोंडभरुन कौतुक केले आहे. या पत्रात ते म्हणाले,
प्रिय, राहुल गांधी,
प्रथम, मी तुमचे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (INC) 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकीत केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करू इच्छितो.
समकालीन राजकारणातील तुमचा होत असलेला उदय मला तुमच्या मातोश्रींच्या (सोनिया गांधी) राजकारणाच्या सुरुवातीच्या काळाची आणि 1998 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारून काँग्रेसला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी घेतलेल्या धाडसी भूमिकेची आठवण करून देतो. त्यावेळी केवळ 3 राज्यांत सत्ता असताना काँग्रेस पक्षाला स्वतःच्या नेत्यांकडून बंडखोरीचा सामना करावा लागत होता आणि त्यामुळे प्रचंड असे विभाजन झाले होते. त्या अत्यंत उद्रेकाच्या काळात आमच्या भारिप बहुजन महासंघ पक्षाने सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला पाठिंबा दिला होता. जेव्हा काँग्रेसचे काही प्रमुख नेते सोनिया गांधी यांच्या ‘विदेशी’ असल्याच्या मुद्द्याला हवा देत होते. आज या पत्राच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला 25 नोव्हेंबर रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आयोजित केलेल्या संविधान सन्मान सभेसाठी आमंत्रित करीत आहोत, असेही आंबेडकर यांनी पत्रात म्हंटले आहे.
दरम्यान, वंचितच्या या निमंत्रणाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीत येण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांनी यापूर्वी तशी अनेकदा इच्छा व्यक्त केली आहे, शिवसेना (ठाकरे गट) युतीनंतरही काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून अद्याप वंचित बहुजन आघाडीला परवानगी मिळालेली नाही. अशात हे आमंत्रण दिल्याने याकडे प्रकाश आंबेडकरांची साखर पेरणी म्हणून बघितले जात आहे. शिवाय या रॅलीच्या निमित्ताने आंबेडकर यांची शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी असल्याचेही बोलले जात आहे.