Varun Sardesai Meet Sandeep Deshpande : राज्यातील राजकारणात मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येणार असल्याची चर्चा जोराने सुरु होती. तर आज 27 जून शुक्रवार रोजी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करत 5 जुलै रोजी मराठी भाषेसाठी निघणाऱ्या मोर्च्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची माहिती दिली आहे. यानंतर आता मनसे आणि शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांची भेटीगाठी सुरु झाल्या आहे.
आज मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांची मुंबईत भेट झाली आहे. मुंबईतील दादरच्या जिप्सी रेस्टॉरंरटमध्ये दोघांमध्ये भेट झाली आहे. या भेटीनंतर मोर्चाच्या नियोजनाबद्दल प्रथमिक चर्चा झाली असल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे. तर आम्ही जरी देखील वेगवेगळ्या पक्षात असलो तरी आमच्यात संवाद होत असतो अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. तसेच आम्ही या आधी देखील भेटलो होतो फक्त ते जाहीर केलं नाही असं देखील आमदार वरूण सरदेसाई म्हणाले.
माध्यमांशी बोलताना वरुण सरदेसाई म्हणाले की, राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना जाहीर पाठींबा दिला आहे. एकाच विषयासाठी दोन मोर्चे काढण्यापेक्षा एकत्रित मोर्चा काढावा असा निर्णय दोन्ही नेत्यांनी घेतला असल्याची माहिती वरुण सरदेसाई यांनी दिली. तसेच यासाठी विद्यार्थी, पालक, कलाकार आणि सामन्य नागरिकांना कशाप्रकारे आवाहन करायचे यासाठी आमची आजची भेट आहे. असं देखील वरुण सरदेसाई म्हणाले.
हिमंत असेल तर गुजराती भाषेला अभिजात दर्जा मिळवून दाखवा…, मनसेकडून भाजपला आव्हान
तर दुसरीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पाच जुलै रोजी होणाऱ्या मोर्च्यात मराठी सर्व राजकीय पक्षांनी सहभाग घ्यावा असं आवाहन केले आहे. तसेच या मोर्च्यात सहभागी होण्यासाठी मनसेकडून सर्व राजकीय पक्षांना संपर्क साधला जाणार असल्याची माहिती देखील राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती.