PM Modi visits Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत येत आहेत. ते सुमारे 29,400 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. (PM Modi) संध्याकाळी 5.30 वाजता मुंबईतील (Mumbai ) गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये पंतप्रधान पोहोचतील, जिथे ते रस्ते, रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित अनेक प्रकल्पांचं लोकार्पण करतील. त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता पंतप्रधान वांद्रे कुर्ला संकुलातील आयएनएस टॉवर्सचं उद्घाटन करणार आहेत.
पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याविषयी मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नवी मुंबईतील तुर्भे येथे मध्य रेल्वेच्या कल्याण यार्ड रिमॉडेलिंग आणि गती शक्ती मल्टीमॉडल कार्गो टर्मिनलची पायाभरणी करणार आहेत. यासोबतच लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नवीन प्लॅटफॉर्म आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म 10 आणि 11 च्या विस्ताराच्या कामाच उद्घाटन करणार आहेत.
ठाणे-बोरिवली बोगदा प्रकल्प 16,600 कोटी रुपये खर्चून बांधला जात आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणारे ट्यूब बोगदे बोरिवलीतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि ठाण्यातील घोडबंदर रोड यांच्यात थेट संपर्क निर्माण करतील. सध्या 11.8 किलोमीटर लांबीचा बोरिवली ठाणे लिंक रोड बांधल्याने ठाणे ते बोरिवली हे अंतर 12 किलोमीटरने कमी होणार असून वेळ एक तासाने कमी होणार आहे.
पंतप्रधान लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच मुंबईत येत आहेत. राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन १२ जुलै रोजी संपले. पंतप्रधान मोदी आज विविध विकास प्रकल्पांच्या पायाभरणीनंतर पश्चिम उपनगरातील नेस्को सेंटर (गोरेगाव) येथे एका सभेला संबोधित करणार आहेत. या सभेच्या तयारीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला राज्यात फक्त 17 जागा जिंकता आल्या होत्या.
महायुती भक्कम! काँग्रेसची आठ मतं फुटल्याने ‘मविआ’ला तडे; जयंत पाटीलही पराभूत
पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याच्या लग्न रिसेप्शला ते उपस्थित राहू शकतात, अशीही सुत्रांची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. ट्रायडेटन हॉटेलच्या आजूबाजूच्या इमारती सुरक्षित केल्या जात आहेत.