PSI Nagargoje arrested in Verul teacher death case : राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या वेरूळ येथील जिल्हा परिषद शिक्षक सुरेश रूपचंद बोरसे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात वैजापूर पोलीस ठाण्याचे फौजदार एकनाथ नागरगोजे यांना अटक करण्यात आली असून अंमलदार वाल्मीक बनगे यांच्यासह दोघांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी ही कठोर कारवाई करत कायद्याचे रक्षकच जर कायदा हातात घेत असतील तर त्यांनाही कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश दिला आहे.
10 जून रोजी रात्री वैजापूर पोलीस ठाण्याचे फौजदार नागरगोजे आणि अंमलदार बनगे हे काही खाजगी व्यक्तींना सोबत घेऊन एका आरोपीच्या शोधासाठी वेरूळ गावात आले होते. आरोपानुसार, मध्यरात्रीच्या सुमारास हे पथक गावातील नागरिकांचे दरवाजे ठोठावत होते. त्यावेळी आपल्या मुलांसाठी आईस्क्रीम आणण्यासाठी बाहेर पडलेल्या शिक्षक सुरेश बोरसे यांनी संबंधित पथकाला रात्री नागरिकांना त्रास का दिला जात आहे, असा प्रश्न विचारला. पथकाने स्वतःला पोलीस असल्याचे सांगितल्यानंतर बोरसे यांनी त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केली.
याच कारणावरून संतप्त झालेल्या फौजदारासह त्यांच्या सोबत असलेल्या काही व्यक्तींनी बोरसे यांना जबरदस्तीने वाहनात बसवून मारहाण केल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यांना वाचवण्यासाठी धावलेल्या महिलांनाही धमकावण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या मारहाणीतच सुरेश बोरसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला असून या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची भावना निर्माण झाली आहे. दरम्यान, सुरुवातीला गुन्ह्यातील आरोपींना ‘अज्ञात’ दाखवण्यात आल्यामुळे शिक्षक संघटना, सामाजिक संघटना आणि लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. विविध राजकीय नेत्यांनी बोरसे कुटुंबीयांची भेट घेत न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
साईबाबांची शपथ घेत भाऊसाहेब वाकचौरे यांची दुसऱ्यांदा गद्दारी; शिर्डीचे शिवसैनिक भडकले
आमदार विक्रम काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली होती. या सर्व घडामोडीनंतर पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी स्वतः बोरसे कुटुंबीयांची भेट घेतली. कुटुंबातील आठ सदस्यांचे जबाब नोंदवण्यात आले. तपासादरम्यान फौजदार एकनाथ नागरगोजे यांचा थेट सहभाग समोर आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आतापर्यंत एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये फौजदार एकनाथ नागरगोजे यांच्यासह सात जण आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी, “वेरूळ येथील शिक्षक मृत्यू प्रकरणाचा अत्यंत पारदर्शक आणि सखोल तपास केला जात आहे. खाकी वर्दीचा गैरवापर करून कायदा हातात घेणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही,” अशी स्पष्ट ग्वाही दिली आहे. सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले असून तपासातून आणखी कोणती धक्कादायक माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
