शिर्डीत खळबळजनक घटना! साईमंदिर गेटसमोर महिलेची चाकूने भोसकून हत्या; दोन तरुणी अटकेत

साई मंदिर परिसरात व्यवसाय करणाऱ्या महिलांमधील वादातून एका 30 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 48

Woman stabbed to death : साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि दररोज हजारो भाविकांच्या उपस्थितीने गजबजलेल्या शिर्डी नगरीत एक धक्कादायक घटना घडली आहे. साई मंदिर परिसरात व्यवसाय करणाऱ्या महिलांमधील वादातून एका 30 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. साई मंदिराच्या गेट क्रमांक 4 समोर रविवारी रात्री झालेल्या या रक्तरंजित घटनेमुळे भाविक, स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री साईनाथ क्षीरसागर (वय 30) या महिला साई मंदिराच्या गेट क्रमांक 4 समोर फळे विकण्याचा व्यवसाय करत होत्या. नेहमीप्रमाणे त्या रविवारी रात्रीही आपला व्यवसाय करत असताना त्याच परिसरात फोटो, स्टिकर आणि फळे विकणाऱ्या अंजली खंडीझोड (वय 22) आणि फिजा पटेल (वय 21) या दोन तरुणींसोबत त्यांचा वाद झाला. सुरुवातीला किरकोळ कारणावरून सुरू झालेला हा वाद काही वेळातच तीव्र झाला.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक चकमक सुरू असताना वातावरण अचानक तापले आणि संतापाच्या भरात अंजली खंडीझोड आणि फिजा पटेल यांनी जयश्री क्षीरसागर यांच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. गजबजलेल्या मंदिर परिसरात अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. गंभीर जखमी झालेल्या जयश्री क्षीरसागर रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या.

मोदी सरकार हादरलं…. आंदोलकांवर लाठीचार्ज आणि अश्रुधूर…दिल्लीत काय-काय घडतंय ?

घटनेनंतर उपस्थित नागरिक आणि स्थानिकांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी साईबाबा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले. मात्र, हल्ल्यात झालेल्या गंभीर जखमांमुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही सोमवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि प्राथमिक तपासाच्या आधारे पोलिसांनी वेगाने कारवाई करत अवघ्या काही तासांत आरोपी अंजली खंडीझोड आणि फिजा पटेल या दोघींना ताब्यात घेतले.

त्यानंतर त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.प्राथमिक तपासात व्यवसायाच्या जागेवरून आणि ग्राहकांशी संबंधित किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या हत्येमागे आणखी कोणते कारण होते का, याचाही तपास पोलीस करत आहेत. आरोपी आणि मृत महिलेमध्ये यापूर्वी काही वाद होते का, तसेच घटनेपूर्वी नेमके काय घडले याचा शोध तपास यंत्रणा घेत आहे.

CJP आंदोलकांनी नड्डांसमोर ठेवल्या तीन प्रमुख मागण्या; पण नड्डांचा CJP ला आंदोलन मागे घेण्याचा सल्ला !

साई मंदिर परिसर हा अत्यंत संवेदनशील आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग मानला जातो. अशा ठिकाणी भर गर्दीत घडलेल्या या खूनप्रकरणामुळे सुरक्षेच्या प्रश्नांवरही चर्चा सुरू झाली आहे. भाविकांच्या उपस्थितीत घडलेल्या या घटनेमुळे अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपी तरुणींना न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्यांची अधिक चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणाचा तपास शिर्डी पोलीस करत असून, तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिर्डीसारख्या धार्मिक आणि शांतताप्रिय शहरात घडलेल्या या हत्याकांडामुळे संपूर्ण नगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून, स्थानिक विक्रेते आणि भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता या प्रकरणात पोलिस तपासातून नेमके सत्य काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us