Download App

पुणे बाजार समिती रणधुमाळी सुरू : अजितदादा विरुद्ध चंद्रकांतदादा ‘सामना’ रंगणार

  • Written By: Last Updated:

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणुकीची अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील पुणे, तळेगाव दाभाडे (मावळ), जुन्नर, मंचर (आंबेगाव), भोर, निरा (पुरंदर), खेड, इंदापूर, दौंड आणि बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचा या निवडणूक कार्यक्रमात सहभाग आहे. उमेदवारांना आज दि. २७ मार्च ते ३ एप्रिल पर्यंत अर्ज भरता येणार आहेत. कोरोना काळात निवडणुका लांबल्यामुळे बाजार समित्यांवर प्रशासक नेमला गेला होता.

या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन २०२२-२३ ते २०२७-२८ या ५ वर्षांच्या कालावधीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी ८ दिवसांचा दिलेला आहे मात्र त्या कालावधीत ३ सुट्ट्या आहेत त्यामुळे ५ दिवसांचाच कालावधी मिळणार आहे.

पुण्यात खळबळ ! मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने खंडणीची मागणी; दोघांविरुद्ध गुन्हा

२० वर्षानंतर पुणे बाजार समितीची निवडणूक

तब्बल दोन दशके प्रशासकीय समितीच्या माधमातून चाललेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचीही निवडणुक होणार आहे. आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहार या कारणांमुळे या समितीचे २००३ मध्ये संचालक मंडळ बरखास्त केले होते. त्यानंतर तब्बल १९ वर्षे या बाजार समितीवर लोकनियुक्त संचालक मंडळाची नियुक्ती न होता प्रशासक राज कायम राहिले. राज्यातील कोणत्याही पक्षाच्या सरकारने समितीच्या निवडणुका प्रलंबित ठेवण्याचेच धोरण अवलंबिले. आता ही प्रशासकीय राजवट संपून लोकनियुक्त संचालक मंडळ येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसह राज्यातील अन्य बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्यावरील स्थगिती उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती उठविल्यानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. उत्पन्नामध्ये मुंबईनंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिल्यानंतर या ठिकाणी निवडणूक होणार आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये आजवर सर्वच स्थानिक संस्थांमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. पण गेल्या काही वर्षात भाजपकडून अनेक ठिकाणी राष्ट्रवादीला धक्का देण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अजितदादा विरुद्ध भाजपचे चंद्रकांत पाटील असा सामना या निवडणुकीच्या निमित्ताने होण्याची शक्यता आहे. आजपासून निवडणून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे, येत्या काही दिवसात याच चित्र स्पष्ट होईल.

सावधान! नगर – पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव, धक्कादायक आकडेवारी आली समोर

Tags

follow us