रक्षकच बनले भक्षक! पुण्यात तोतया पत्रकार, महिला पोलिस आणि पोलिस नाईक यांचा एक कोटींच्या दरोड्याचा कट

एका व्यावसायिकाला लक्ष्य करून तब्बल एक कोटी रुपयांच्या रकमेवर डल्ला मारण्याचा कट रचल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

Untitled Design   2026 07 27T080350.839

Untitled Design 2026 07 27T080350.839

Questions raised about Pune Police : पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील एका व्यावसायिकाला लक्ष्य करून तब्बल एक कोटी रुपयांच्या रकमेवर डल्ला मारण्याचा कट रचल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाची सर्वात गंभीर बाब म्हणजे दरोड्याच्या या कटात दोन पोलिस कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. एका महिला पोलिस हवालदार, एका पोलिस नाईक आणि स्वतःला पत्रकार म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीने मिळून हा संपूर्ण कट रचल्याचा आरोप असून, त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

तळेगाव दाभाडे येथील व्यावसायिक हर्षवर्धन पवार यांच्यासोबत हा थरारक प्रकार घडला. हर्षवर्धन यांचे शेजारी किरण आपटे यांच्या माध्यमातून त्यांचा संपर्क एका व्यावसायिक व्यवहारासाठी झाला होता. किरण आपटे यांच्या ओळखीतील चव्हाण इंटरप्रायजेस या संस्थेला एक कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर हर्षवर्धन पवार यांनी ती रक्कम देण्यास तयारी दर्शवली.

18 जुलै रोजी हर्षवर्धन पवार आपल्या एका कामगारासह दुचाकीवरून पुण्यातील सिंहगड रस्त्यावर आले. त्यांच्याकडे एक कोटी रुपयांची रोख रक्कम होती. हॉटेल ब्रम्हा परिसरात किरण आपटे यांची त्यांच्याशी भेट झाली. त्यानंतर चव्हाण इंटरप्रायजेसकडील व्यक्ती चारचाकी वाहनातून तेथे आली. नऱ्हे येथील बँकेत रक्कम जमा करायची असल्याचे सांगून हर्षवर्धन यांना गाडीत बसवण्यात आले.

गाडीत हर्षवर्धन पवार, किरण आपटे, चालक विक्रम चाकणकर आणि आणखी एक व्यक्ती असे चौघे होते. हर्षवर्धन आणि आपटे यांच्या मध्ये एक कोटी रुपयांची रक्कम असलेल्या दोन बॅगा ठेवण्यात आल्या होत्या. नऱ्हे येथील बँकेकडे जाण्याऐवजी चालकाने वाहन थेट पुलाच्या दिशेने वळवले. याचवेळी मागून आलेल्या दुचाकीवरील दोन व्यक्तींनी गाडी अडवली.

NEET Paper Leak: नीटमध्ये कमी मार्क, अहिल्यानगरमधील विद्यार्थीनीने आयुष्य संपवलं, चिठ्ठीत म्हणाली माझ्या आत्महत्येसाठी….

दुचाकीवरून उतरलेल्या दोघांनी स्वतःला पोलीस असल्याचे सांगत गाडी थांबवण्यास भाग पाडले. तुमच्याकडे दोन नंबरचे पैसे आहेत, आम्हाला माहिती मिळाली आहे, असे सांगून त्यांनी चौकशीचा आव आणला. त्यानंतर दुचाकीवरील दोघे आणि गाडीतील आणखी एक व्यक्ती यांनी मिळून पैशांच्या बॅगा हिसकावून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. यावेळी झालेल्या झटापटीत हर्षवर्धन पवार यांच्या डोळ्यांत मिरची पावडर फेकण्यात आली. परिस्थिती गोंधळाची बनली. या झटापटीदरम्यान किरण आपटे 73 लाख 50 हजार रुपयांची बॅग घेऊन कसाबसा गाडीतून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. मात्र हर्षवर्धन पवार गाडीतच अडकून पडले.

त्यानंतर दुचाकीवरील एका व्यक्तीने चालकाला दमदाटी करत वाहन थेट खेड शिवापूर पोलिस चौकीकडे नेण्याचे आदेश दिले. दुपारी सुमारे दोनच्या सुमारास गाडी पोलिस चौकीत पोहोचली. तेथे त्या व्यक्तीने स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे भासवत, यांच्याकडे बेकायदेशीर पैसे आहेत, मी त्यांना पकडून आणले आहे, असा गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती प्रत्यक्षात स्वतःला पत्रकार म्हणवून घेणारा आशीष तिवारी होता. धक्कादायक बाब म्हणजे त्या वेळी सुट्टीवर असलेल्या महिला पोलिस हवालदार प्रमिला निकम या खाकी गणवेशात पोलिस चौकीत उपस्थित होत्या. त्यांच्यासोबत पोलिस नाईक अजित इरफू मेस्त्री हेही होते. या दोघांनी आशीष तिवारीची बाजू घेत हर्षवर्धन पवार यांना धमकावण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे.

तुम्ही बेकायदेशीर व्यवहार करत आहात, तुम्हाला अटक होऊ शकते, अशी भीती दाखवून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र याचदरम्यान घडत असलेल्या प्रकाराची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. वरिष्ठ अधिकारी तातडीने खेड शिवापूर पोलिस चौकीत दाखल झाले आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या हस्तक्षेपानंतर हर्षवर्धन पवार यांच्या बॅगेतून गायब झालेली सुमारे सात ते आठ लाख रुपयांची रक्कम परत मिळाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर हर्षवर्धन पवार यांनी नऱ्हे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सीजेपी पार्टीच्या मोठ्या यशानंतर आता सोशल मीडियावर ‘E20’चा धुमाकुळ, केली ‘या’ मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी

विशेष म्हणजे, सुरुवातीला दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात पोलिस कर्मचारी प्रमिला निकम, अजित मेस्त्री आणि कथित पत्रकार आशीष तिवारी यांची नावे समाविष्ट करण्यात आली नव्हती. मात्र पुढील तपासात त्यांचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांना पुरवणी गुन्हा दाखल करून त्यांची नावे आरोपी म्हणून समाविष्ट करावी लागली. या प्रकरणात स्वतःला पत्रकार म्हणवून घेणाऱ्या आशीष तिवारीला अटक करण्यात आली आहे. घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत पोलिसांनी संपूर्ण कटाचा उलगडा केला. तपासादरम्यान राजगड पोलिस ठाण्यात कार्यरत महिला पोलिस हवालदार प्रमिला निकम आणि पोलिस नाईक अजित इरफू मेस्त्री यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणात एकूण दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी चौघांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित सहा आरोपी, ज्यामध्ये दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे, सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे पुणे ग्रामीण पोलिस दलाची प्रतिमा पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आली आहे. काही दिवसांपूर्वी कामशेत पोलिस ठाण्याशी संबंधित खंडणीप्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आता राजगड पोलिस ठाण्याशी संबंधित कर्मचाऱ्यांची नावे दरोड्याच्या कटात समोर आल्याने कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणारेच गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी होत असल्याची गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

रक्षणाची जबाबदारी असलेलेच जर गुन्हेगारी कटात सहभागी होत असतील, तर सर्वसामान्य नागरिकांनी विश्वास कुणावर ठेवायचा, असा प्रश्न या प्रकरणानंतर उपस्थित होत आहे.

Exit mobile version