Download App

‘स्वत:च्या राजकीय स्वार्थापोटी भाजप कार्यकर्त्यांचे खच्चीकरण…; कोल्हेंचा विखेंवर घणाघात

Radhakrishna Vikhe Patil On Vivek Kolhe: पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) हे जिल्हा नियोजन समितीअंतर्गत कोपरगाव विधानसभा मतदारसंघासाठी विकास कामे मंजूर करताना दुजाभाव करत असून, राजकीय द्वेषभावनेतून त्यांनी ग्रामपंचायतींना विविध योजनांतर्गत शासनाकडून मिळणारा निधी जाणीवपूर्वक अडवला आहे. (AHMEDNAGAR News) त्यांनी हजारो दलित, आदिवासी समाजबांधवांसह गोरगरीब जनतेला शासकीय विकास निधीपासून वंचित ठेवले आहे. ते कोपरगाव व राहाता तालुक्यातील जनतेवर जाणीवपूर्वक अन्याय करीत असून, हा अन्याय थांबविण्यासाठी मी विखेंच्या विरोधात जनतेचे नेतृत्व करायला कधीही तयार आहे, असे सांगत विवेक कोल्हे यांनी विखे पाटलांवर घणाघाती टीका केली. जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी आपण विखेंच्या विरोधात नेतृत्वाचा विडा उचलण्यास समर्थ आहोत असे सूतोवाचही कोल्हे यांनी केले.

कोपरगाव विधानसभा (Kopargaon Assembly) मतदारसंघातील ग्रामपंचायतींना विविध योजनांतर्गत मिळणाऱ्या शासकीय निधी वितरणात पालकमंत्री विखे यांच्याकडून जाणीवपूर्वक झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ व जनतेच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी युवा नेते कोल्हे आक्रमक झाले आहे. दलित, आदिवासींचा व ग्रामपंचायतींचा निधी अडवणाऱ्या पालकमंत्र्यांचा निषेध असो, नही चलेगी, नही चलेगी, दादागिरी नही चलेगी, राजकीय डाव, हुकूमशाही बंद करा, कोण म्हणतो देणार नाही, आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही, शासकीय निधी वितरणात दुजाभाव नको, पाटपाण्याचा बट्ट्याबोळ, शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ अशा विविध घोषणांनी आंदोलनकर्त्यांनी शिर्डी दणाणून सोडली होती. या मोर्चाच्या निमित्ताने कोल्हे यांनी जोरदार टोलेबाजी करत राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना ललकारत पुन्हा एकदा त्यांच्यावर टीकेची तोफ डागली. त्यांनी खा. सुजय विखे, आ. आशुतोष काळे यांच्यावरही जोरदार टीका केली.

कोल्हे म्हणाले, पालकमंत्री विखे पाटील हे स्वत:च्या राजकीय स्वार्थापोटी भाजप कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करून प्रतिस्पर्ध्यांना संपवण्यासाठी मुस्कटदाबी व दडपशाहीचे राजकारण करत आहेत. ते संपूर्ण जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत; पण शासकीय निधी वाटपात ते दुजाभाव करत असून, ‘अडवा आणि जिरवा’ पद्धतीचे राजकारण करून आमच्यासारख्या पक्षातील निष्ठावान नेत्यांना हेतूत: त्रास देत आहेत. त्यांनी आ. आशुतोष काळे यांना हाताशी धरून कोपरगाव मतदारसंघातील कोल्हे गटाच्या ताब्यातील ग्रामपंचायतींना शासनाकडून मिळणारा विकास निधी जाणीवपूर्वक रोखून धरला आहे. गेल्या दीड-दोन वर्षापासून त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. गेल्या ३० ते ४० वर्षांपासून विखे यांच्या कुटुंबात आमदार, खासदार, मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष अशी सत्तेची विविध पदे आहेत; पण सत्ताकाळात त्यांनी जनतेचे विकासाचे प्रश्न सोडविण्याऐवजी फक्त स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम केले.

‘मावळ’ ‘राष्ट्रवादी’कडे गेलं, तर काय करणार? बाळा भेगडेंच्या उत्तराने ‘इलेक्शन पिक्चर’ क्लिअर!

पालकमंत्र्यांच्या मनमानी कारभाराने अनेक गावांतील पाणी, रस्ते, सिंचनासह विकासाचे अनेक प्रश्न रखडले आहेत. भाजप सत्तेत असूनही पालकमंत्री विखे यांच्याकडून आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे, गळचेपी होत आहे. आम्ही राजकीय स्वार्थासाठी आ. काळे यांच्यासारखे गुडघ्यावर बसून तुमचे पाय चेपणार नाही तर स्वाभिमानाने जनतेच्या प्रश्नांसाठी लढत राहू. कोपरगाव मतदारसंघातील जनता आ. आशुतोष काळेंच्या निष्क्रियतेला पुरती कंटाळली असून, अशा निष्क्रिय आमदारांची गॅरंटी तुम्ही घेता. मात्र आम्ही तुमच्या दडपशाही व हुकूमशाहीच्या राजकारणाला जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी विखे पिता-पुत्रांना दिला.

follow us